सांगोला : पुढारी वृत्तसेवा सांगोला ते वासूद अकोला रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत व दोन्ही साईडला काटेरी वृक्ष वाढले आहेत, यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे . या रस्त्याची बातमी पुढारीने प्रसिद्ध केल्यावर तत्काळ प्रशासनाने याची दखल घेऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूची काटेरी वृक्ष काढण्याची व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे, यामुळे प्रवाशांमधून 'पुढारी' वृत्तपत्राला धन्यवाद दिले जात आहे.
सांगोला ते वासुद अकोला हा सहा किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाला आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच साईड पट्टी ही नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढले आहेत हे काटेरी वृक्ष पावसामुळे व वार्या मुळे रस्त्यावर आले आहेत. समोरा समोरून येणारी दोन वाहने सहजा सहजी पास होत नाहीत, यामुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. हा रस्ता सांगोला ते डोंगरगाव असा असून, या रस्त्यावरून सांगोला शहराकडे येणार्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते डोंगरगाव हणमंतगाव मानेगाव निजामपूर अकोला वासुद या गावचे प्रवाशी तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येतात व विद्यार्थीही येतात तसेच दूध उत्पादकही या रस्त्यावरून प्रवास करतात अकोला येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व सांगोला येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी व शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात यामुळे या रस्त्यावर कायमच रहदारी असते, परंतु गेल्या वर्षांपासून हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे मोटर सायकल चार चाकी वाहनाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे या खड्डेमय रस्त्यांमुळे रुग्ण वयोवृद्ध यांना या रस्त्यावरून प्रवास केल्यानंतर त्रास होतो तसेच या खराब रस्त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत.
गेल्या चार दिवसांत पावसाची रिपरिप चालू आहे. या पावसाच्या पाण्याने व चिखलाने रस्त्यावरील खड्या माखले आहेत. बातमी प्रसिद्ध होताच याची दखल घेऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे काटेरी वृक्ष जेसीबी च्यासाह्याने काढले जात आहेत. रस्त्यावरील खड्डे भरले जात आहेत यामुळे या रस्त्यावरून ये – जा करणार्या प्रवाशा मधून समाधान व्यक्त केले जात आहे. 'पुढारी' ला धन्यवाद दिले जात आहे.