Uncategorized

रत्नागिरी : रस्ता न करताच निधी खर्च?

मोहन कारंडे

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रस्ता न करताच त्याच्यावर निधी खर्च केल्याचा व एकाच संरक्षक भिंतीवर वारंवार पैसे खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लांजा तालुक्यात हा प्रकार घडला असून, लाखो रुपयांचा गोलमाल झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

लांजा तालुक्यातील विवली बौद्धवाडीचा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 2 लाख 97 हजार 339 रूपये मंजूर झाले. याचबरोबर तेलीवाडी ते चौगुले घर या रस्त्यासाठीही 2 लाख 48 हजार रूपये मंजूर झाले. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता न करताच निधी खर्च केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. संबंधित ठेकेदार व काही अधिकारी संगनमताने हा निधी हडप केल्याचे बोलले जात आहे.

केळंबे-खानविलकरवाडीमध्ये एक संरक्षक भिंत बांधण्यात आली. ही भिंत खासगी जागेत असून, त्यावर वारंवार पैसे खर्च केल्याचे दिसून येत आहे. यावर्षी तिच्यावर 2 लाख 96 हजार 431 असा खर्च दाखवण्यात आला आहे. आता हा खर्च अंतिम मंजुरीसाठी जि. प. बांधकाम विभागाकडे आल्याचे समजते. त्याची एमबी नंबर 1223 असा असल्याचेही सांगण्यात येत आहे.

केळंबे गावातच एका मंदिराजवळच्या रस्त्यावर संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याच जागेवर 11 एप्रिल 2022 रोजी पुन्हा याच नावाने काम करण्यात येत आहे. 14 लाख 66 हजार रुपयांचे हे काम आहे. यामुळे येथेही गोलमाल असल्याचे बोलले जात आहे.

या चारही कामात लाखो रूपयांचा गोलमाल असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. संबंधित ठेकेदार आणि काही अधिकारी यांचे संगनमत असल्याचीही चर्चा आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

तिन्ही कामांची एमबी एकच

लांजा तालुक्यातील केळंबे-खानविलकरवाडी संरक्षक भिंत 2 लाख 96 हजार, विवली बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण 2 लाख 97 हजार, विवली तेलीवाडी ते चौगुले घर डांबरीकरण रस्ता 2 लाख 48 हजार या तिन्ही कामांची एमबी एकच करण्यात आली आहे. यावरून सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT