पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अॅनिमिया मुक्त पिंपरी चिंचवड शहर करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मिशन अक्षय मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले. शहराच्या विकासात महत्वपूर्ण घटक असलेल्या अधिकारी व कर्मचार्यानी अॅनिमिया मुक्त असणे आवश्यक आहे. सर्वांनी रक्त तपासणी करून घ्यावी. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी असल्यास लगेच डॉक्टरांच्या सल्लाने उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी शुक्रवारी केले.
महापालिका भवनात आयोजित हिमोग्लोबिन तपासणी शिबिरात 745 जणांची सहभाग घेतला. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. शैलजा भावसार, डॉ. सुनीता साळवे व अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त पाटील म्हणाले, की रक्तामध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया हा आजार जडतो. रक्तामध्ये हिमोग्लोबिन आवश्यक प्रमाण राखणे गरजेचे आहे. अॅनिमिया रोगाशी लढण्यासाठी सर्वांनी हिमोग्लोबिनची तपासणी करावी.
शिबिरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रात 185 अधिकारी व कर्मचार्यांना बुस्टर डोस देण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेच्या सर्व दवाखाना, रुग्णालयात मिशन अक्षय मोहीमेअंतर्गत अंगणवाडी, शाळा, दवाखाने, रुग्णालयांमधून बालक, विद्यार्थी व महिलांना जंतनाशक व प्रतिबंधात्मक गोळ्या देण्यात येत आहेत.