पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा कै. आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा याकरिता नानांच्या 5 मासिकांसाठी मला सरकोली येथे येता आले नाही. कुटुंबावर दुःखाचा डोंगर असताना माझे कुटुंबासह नातेवाईकांची भेट घेता आली नाही. परंतु, मी हे सर्व बाजूला सारून कारखान्यासाठी प्रयत्न करत राहिलो, मात्र विरोधकांनी सतत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्याचे भगीरथ भालके यांनी सांगीतले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आज कोर्टी, तिसंगी, सोनके, गार्डी, बोहाळी खर्डी, तप.शेटफळ आदी भागात प्रचार सभा संपन्न झाली. श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारा दरम्यान युवा नेते श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके हे बोलत होते. भगीरथ भालके म्हणाले की, सभसदांचे पैसे मिळवण्यासाठी माजी केंदीय कृषिमंत्री शरद पवार ,उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे कायम पाठपुरावा केला. परंतु माझे सहकारी असलेले संचालक युवराज पाटील यांनी साखर आयुक्त, वित्तीय बँका, साखर व्यापारी यांना चुकीची माहिती देऊन कारखान्याला अडचणीत आणण्याचे काम केले.
तेच श्री युवराज पाटील आज आपल्यासमोर गावोगावी प्रचार सभेत शेतकर्यांचे पैसे, कामगारांचे पैसे न देण्याचा आरोप करीत आहेत. त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवा, असे आवाहन भालके यांनी केले. यावेळी संचालक समाधान काळे, मनसे नेते दिलीप धोत्रे, भालचंद्र मोरे, अमित डोंबे, गोकुळ जाधव, दत्तात्रय पाटील, द्रोणाचार्य हाके, शशिकांत बागल, भारत कोळेकर, दत्तात्रय खरात, बाबा हाके, धोंडीबा वाघमारे, बापूसाहेब गायकवाड, अनिल वाघमोडे, सिद्धेश्वर मोरे, मधुकर मोरे, सुदाम मोरे, महादेव देठे, परमेश्वर देठे, धनाजी घाडगे, नेताजी सावंत, शालिवाहन कोळेकर, भास्कर मोरे, नारायण शिंदे यांच्यासह श्री विठ्ठल कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.