Uncategorized

मोहोळ : ट्रक चालकाला बांधून रोख रकमेसह अज्ञात चोरट्यांनी ट्रक पळविला

Arun Patil

मोहोळ ; पुढारी वृत्तसेवा : मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावच्या शिवारात आणखी एक लुटमारीची घटना समोर आली आहे. ४ जून रोजी पहाटे तीन वाजता एका ट्रक चालकाला अज्ञात चोरट्यांनी बंदुक आणि तलवारीचा धाक दाखवून, त्याला बांधून, त्याच्या खिशातील रोख रक्कम, महत्त्वाच्या कागदपत्रांसह स्टीलने भरलेला ट्रक लंपास केला. प्रवीण अंबादास सरगर (वय ३५, रा. नाझरा, ता. सांगोला) असे लूट झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रवीण अंबादास सरगर हे १ जून रोजी मालट्रक (एम.एच. १० झेड १३५२) घेऊन जालना येथे गेले होते. तीन जून रोजी ते मालट्रक मध्ये स्टील घेऊन कुर्डूवाडी पंढरपूर रोडने माघारी निघाले होते. ४ जून रोजी पहाटे तीन वाजता त्यांचा ट्रक मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावच्या हद्दीत आली होता.

गाडीची ताडपत्री काचेवर आल्याने प्रवीण सरगर हे गाडी थांबवून ताडपत्री व्यवस्थित करून लघुशंका करत होते. यावेळी एका इंडिका कार मधून आलेल्या सहा जणांपैकी चौघांनी त्यांना पकडून उसाच्या शेतात नेले. त्या ठिकाणी त्यांना तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवून आरडाओरडा केला तर खल्लास करून टाकेन अशी धमकी दिली. त्यांचे हात-पाय बांधून डोळ्याला काळी पट्टी बांधली.

त्यानंतर त्या इसमांनी प्रवीण सरगर यांच्या खिशातील वीस हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल, ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड, आधार कार्ड, गाडीचे आर.सी. बुक इत्यादी कागदपत्रांसह २० टन स्टीलने भरलेली मालट्रक असा १३ लाख ६१ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पहाटे पाच वाजता कसाबसा प्रयत्न करून सरगर यांनी हाता पायाला बांधलेली दोरी सोडून रस्त्यावर आले. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या एका वस्तीवर जाऊन १०० या टोल फ्री नंबर वर कॉल करून घडल्या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाला माहिती दिली.

या प्रकरणी प्रवीण सरगर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सहा अज्ञात दरोडेखोरांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत. या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चार दिवसांत वाहन चालकाला लुटल्याची दुसरी घटना

शेटफळ गावच्या परिसरात घरफोडी व लुटमारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वीच एका वाहन चालकाला लुटल्याची घटना ताजी असताना याच परिसरात लुटमारीच्या या नव्या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून लवकरात लवकर गुन्ह्याचा छडा लावण्याची नागरिकातून मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT