Uncategorized

मुळ्याची बारमाही करा लागवड

backup backup

मुळ्याची बारमाही लागवड

काही पिके ठराविक हंगामातच घेता येतात. त्या काळात पिकवलेल्या पिकांना निसर्गाचीही साथ लाभते आणि त्यांची वाढ चांगली होते. त्यांना बाजारातही चांगली मागणी असते. पण अलीकडच्या काळात संशोधन करण्यात येऊन काही जाती विकसित करण्यात आल्या आहेत. त्याची माहिती शेतकर्‍यांनी घ्यायला हवी. मुळा हे अशाच प्रकारचे पीक आहे. पूर्वी केवळ थंड हवामानातच मु़ळ्याचे उत्पादन घेतले जात असे; पण आता उष्ण हवामानातही मुळ्याची लागवड करता येते. अशा प्रकारे मुळा वर्षभर केव्हाही घेता येतो. आरोग्याच्या दृष्टीनेही मुळ्याचे महत्त्व असल्याने त्याला ग्राहकांकडून नेहमी मागणी असते.

मुळा या पिकाचे जमिनीत वाढणारे मूळ आणि वरचा हिरवा पाला यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. मुळा किसून किंवा पातळ चकत्या करून त्यावर मीठ टाकून लिंबू पिळून खाल्यामुळे भूक वाढते. तसेच पचनशक्तीही वाढते. मुळ्यामध्ये असणार्‍या सारक गुणधर्मामुळे बद्धकोष्ठता असणार्‍या व्यक्तींसाठी मुळा अतिशय उपयुक्त आहे. मुळा कच्चा खातात किंवा त्याची शिजवून भाजी करतात. मुळ्याच्या हिरव्या पाल्याची आणि शेंगांची भाजी करतात, मुळ्याची कोशिंबीर करतात. मुळ्याच्या हिरव्या पानांमध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. मुळ्यामध्ये चुना, फॉस्फरस, पोटॅशियम ही खनिजे आणि काही प्रमाणात 'अ' व 'क' जीवनसत्त्वे असतात.

थंड हवामानातील पीक, मुळ्याची बारमाही लागवड

मुळा हे प्रामुख्याने थंड हवामानातील पीक आहे. मुळ्याची वाढ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला झपाट्याने होते; परंतु चांगला स्वाद आणि कमी तिखटपणा येण्यासाठी मुळ्याच्या वाढीच्या काळात 15 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असावे. मुळ्याच्या वाढीच्या काळात तापमान जास्त झाल्यास मुळा लवकर जून होतो आणि त्याचा तिखटपणाही वाढतो. मुळ्याची जमिनीतील वाढ चांगली होण्यासाठी लागवडीसाठी निवडलेली जमीन भुसभुशीत असावी. भारी जमिनीची चांगली मशागत करावी, अन्यथा मुळ्याचा आकार वेडावाकडा होतो आणि त्यावर असंख्य तंतूंमुळे येतात. अशा मुळ्याला बाजारात मागणी नसते. मुळ्याची लागवड अनेक प्रकारच्या जमिनीत करता येत असली तरी मध्यम ते खोल भुसभुशीत अथवा रेताड जमिनीत मुळा चांगला पोसतो. चोपण जमिनीत मुळ्याची लागवड करू नये. पुसा हिमानी, पुसा देशी, पुसा चेतकी, पुसा रेशमी, जपानीज व्हाईट, गणेश सिथेटिंग या मुळ्याच्या आशियाई किंवा उष्ण समशितोष्ण हवामानात वाढणार्‍या जाती आहेत.

मुळ्याची व्यापारी लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत बियांची पेरणी करावी. उन्हाळी हंगामासाठी मार्च-एप्रिल महिन्यांत, तर खरीप हंगामासाठी जून ते ऑगस्ट महिन्यांत बियांची पेरणी करावी. मुळ्याची लागवड करताना दोन ओळींतील अंतर 30 ते 45 सें.मी. आणि 2 रोपांमधील अंतर 8 ते 10 सें.मी. ठेवावे. मुळ्याची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी वरंब्यावर केली जाते. दोन वरंब्यांमधील अंतर मुळ्याच्या जातीवर अवलंबून असते. युरोपीय जातीसाठी हे अंतर 30 सें.मी. ठेवतात, तर आशियाई जातीकरिता 45 सें.मी. ठेवतात. वरंब्यावर 8 सें.मी. अंतरावर 2-3 बिया टोकून पेरणी करतात. सपाट वाफ्यात 15-15 सें.मी. अंतरावर लागवड करतात. बियांची पेरणी 2-3 सें.मी. खोलीवर करावी. पेरणीपूर्वी जमिनीत ओलावा असावा. मुळा लागवडीचे अंतर हे मुळ्याची जात, त्याची वाढ आणि हंगामावर अवलंबून असते. तथापि, कमी अंतरावर लागवड केल्यास मध्यम आकाराचे मुळे मिळून उत्पादन जास्त मिळते.

मुळ्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी 10 ते 12 किलो बियाणे लागते. मुळ्याचे पीक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे जास्त उत्पादन मिळण्यासाठी या पिकाला खते वेळेवर द्यावीत. जमिनीची मशागत करताना चांगले कुजलेले शेणखत 25 टन दर हेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे. मुळ्याच्या पिकाला दर हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालांश द्यावे. स्फुरद आणि पालांश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची उरलेली अर्धी मात्रा बिया उगवून आल्यावर म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी द्यावी. कोरड्या जमिनीत मुळ्याची पेरणी करू नये. बियांची पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे.

मुळ्याची आंतरमशागत कमी अंतरावर करतात. म्हणून जमिनीची मशागत चांगली करणे आवश्यक आहे. पीक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे सुरुवातीच्या काळात पिकात खुरप्याच्या सहाय्याने निंदणी वेळेवर करून पीक तणरहित करावे. साधारणपणे दोन निंदण्या कराव्यात. एक खोदणी आणि एक निंदणी सुरुवातीच्या काळात करावी. मुळे लांब वाढणार्‍या जातींना आवश्यकतेप्रमाणे भर द्यावी.

मुळ्याची बारमाही लागवड : मुळ्यावरील प्रमुख कीड

काळी अळी ही मुळ्यावरील एक प्रमुख कीड आहे. लागवड झाल्यावर आणि मुळ्याची उगवण झाल्यावर सुरुवातीच्या काळात या काळ्या अळीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. या अळ्या पाने खातात आणि त्यामुळे पानांवर छिद्रे दिसतात. या अळीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 20 मिलिलिटर मिलॅथिऑन मिसळून पिकावर फवारावे.

मावा या किडीचा उपद्रव ढगाळ हवामानात जास्त प्रमाणात होतो. या किडीची पिल्ले तसेच पौढ किडे पानांतील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे पाने गुंडाळली जातात. रोप कमजोर होते. या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 20 मिलिलिटर मिलॅथिऑन मिसळून पिकावर फवारावे. मुळ्याच्या पिकावर करपा रोग मोठ्या प्रमाणावर आढळतो. या बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पिवळे
फुगीर डाग अथवा चट्टे पडतात. नंतर खोडावर आणि शेंगांवर पिवळे डाग पडतात. पावसाळी हंगामात रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात हातो. या रोगाच्या नियंत्रणसाठी 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम 45 हे बुरशीनाशक मिसळून फवारणीकरावी.

लागवड केल्यानंतर जातीनुसार 40 ते 45 दिवसांनी मुळे काढणीसाठी तयार होतात. नाजूक आणि कोवळे असतानाच मुळ्यांची काढणी करावी. मुळा जास्त दिवस जमिनीत राहिल्यास कडसर, तिखट आणि जरड होतो, मुळ्याला गाभा रवाळ होऊन भेगा पडतात. मुळे काढण्यापूर्वी शेताला पाणी द्यावे आणि हाताने मुळे उपटून काढावेत. नंतर त्यावरील माती काढून मुळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. किडलेले, रोगट मुळे वेगळे काढावेत. मुळे पाल्यासह काढून विक्रीसाठी पाठवतात. पाने आणि मुळे यांना इजा होऊ नये म्हणून टोपलीत किंवा खोक्यात व्यवस्थित रचून विक्रीसाठी पाठवावेत.

मुळ्याचे उत्पादन हे मुळ्याची जात आणि लागवडीचा हंगाम यावर अवलंबून असते. साधारणपणे रब्बी हंगामात मुळ्याचे दर हेेक्टरी 30 ते 35 टन उत्पादन मिळते. या मुळ्याला बाजारात चांगली मागणी असते. हे पीक घेऊन शेतकर्‍याला अधिक उत्पन्न घेता येऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT