Uncategorized

बेपर्वाईमुळे रखडली विहिरींमधून पाण्याची योजना

backup backup

सोलापूर ः वेणुगोपाळ गाडी विहिरींद्वारे पाणीपुरवठ्याची योजना महापालिकेच्या बेपर्वाईमुळे रखडली आहे. काही विहिरींमधून पाणीपुरवठा सुरू असून अन्य विहिरींचा वापर केल्यास पिण्याचा पाण्याचा अपव्यय टळण्यास मदत होणार आहे. धुणी-भांडी आदी कामांसाठी विहिरींच्या पाण्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. याबाबत मनपा प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.
स्रोतांमध्ये पाणी असूनदेखील केवळ जलसाठवणूक क्षमतेचा अभाव, वितरणप्रणाली दोष आदी कारणांमुळे शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, हे भीषण वास्तव आहे. सध्या प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुधारण्यासाठी समांतर जलवाहिनी, स्काडा प्रणाली आदी विविध योजनांची कामे सुरू आहेत.

'स्मार्ट सिटी'त समावेश झालेल्या शहरात लवकरच नळांना मीटर बसवून पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पिण्याव्यतिरिक्त धुणी-भांडी व अन्य कामांसाठी होणारा पाण्याचा वापर टळणार आहे. अशावेळी शहरातील विहिरींचे पाणी उपयोगात येऊ शकते.
उन्हाळ्यात पाणीटंचाई जास्त प्रमाणात भासते. याकाळात शहरातील विहिरींच्या पाण्याचा वापर करण्याविषयी लोकप्रतिनिधी चर्चा करतात. यावर प्रशासनाकडून विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव आणला जातो. तोपर्यंत उन्हाळा संपून जातो आणि योजना कागदावरच राहते, असा अनुभव आहे. शहरात मनपाच्या मालकीच्या अनेक विहिरी आहेत. यामध्ये साखर पेठ, तेलंगी पाच्छा पेठेतील सुभाषनगर उद्यान, अशोक चौकातील मार्कंडेय उद्यान, दमाणीनगर उद्यान येथील विहिरींचा समावेश आहे. याशिवाय शहरात अनेक खासगी विहिरीही आहेत. या विहिरींच्या पाण्याचा वापर करता येणे शक्य आहे.

साखर पेठ विहिरीतून पाणीपुरवठा करण्याची योजना सन 2005 मध्ये तत्कालीन नगरसेवक पांडुरंग दिड्डी यांच्या पुढाकारातून राबविण्यास सुरुवात झाली. सध्या या विहिरीच्या पाण्याचा वापर पाईपलाईनद्वारे काही नागरी भागात तसेच विणकर बागेसाठी होत आहे. अशीच योजना गंगा विहिरीच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. किल्ला बागेतील नागबावडी विहिरीतून पाणीपुरवठा करण्यासाठी तत्कालीन नगरसेवक पद्माकर काळे यांनी पुढाकार घेत 18 लाखांचा खर्चही केला; मात्र पुरातत्व खात्याकडून परवानगी न मिळाल्याने ही योजना फसली. या पार्श्‍वभूमीवर मनपाने सुमारे 10 वर्षांपूर्वी शहरातील 13 विहिरींवर जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून पाणीपुरवठ्याची योजना आखली होती.

यानुसार मक्ताही दिला होता. मात्र खासगी विहिरींचे गहाणखत करण्याची मनपाने घातलेली अट मालकांनी अमान्य केल्याने बारगळली. मक्तेदाराने साखर पेठ, सुभाष उद्यान येथे फिल्टर मशीन बसविण्याचे काम सुरू केले. मात्र हे काम वादग्रस्त होऊन अर्धवटच राहिले. तद्नंतर प्रशासनाकडून ही योजना मार्गी लावण्यासाठी गत अनेक वर्षे काहीच प्रयत्न झाले नाहीत. सध्या जुनी विष्णू चाळ येथील माजी नगरसेवक दिलीप कोल्हे यांच्या विहिरीतून मनपा जेटिंग मशीन, ड्रेनेज, शौचालय स्वच्छतेसाठी पाणी घेते. जुनी मिल आवारातील विहीर, रेल्वेलाईन्स भागातील पारशी विहीर, किल्ला बागेतील नागबावडी विहीर, दमाणीनगर उद्यानातील विहीर, मार्कंडेय उद्यानातील विहीर यासह विविध विहिरींमधून पाणीपुरवठ्याची योजना आखल्यास त्याचे पाणी कायमस्वरुपी धुणी-भांडीबरोबरच टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठीदेखील मोठ्या प्रमाणात करता येणार आहे.

मीटरमुळे समजणार पाण्याचे मोल

नळांना मीटर लावण्यात येणार असून तर तीन महिन्यांनी वापरानुसार नागरिकांना बिल भरावे लागणार आहे. परिणामी मीटरमुळे पाण्याचे मोल नागरिकांना समजणार आहे. धुणी-भांडी आदींसाठी होणारा पाण्याचा अपव्यय टळणार आहे. अशावेळी विहिरींच्या पाणीपुरवठ्याची योजना धुणी-भांडी, स्वच्छतेच्या कामासाठी निश्‍चितच उपयोगी पडणार आहे.

शहरातील खासगी विहिरींच्या पाण्याच्या वापराला मालकांची हरकत नाही. मात्र गहाणखत करण्याची अट अव्यवहार्य होती. त्यामुळे खासगी विहिरींच्या पाणीपुरवठ्याची मनपाची योजना फसली.
– दिलीप कोल्हे
माजी नगरसेवक

साखर पेठ विहिरीवरील फिल्टर मशिनचे काम अर्धवट आहे. हे काम पूर्ण करुन पिण्याचा पाणीपुरवठा करण्याबाबत मी आग्रही असून आगामीकाळात पाठपुरावा करणार आहे.
– पांडुरंग दिड्डी, माजी नगरसेवक

विहिरींमधून पाणीपुरवठ्याची योजना माझ्या काळातील नाही. त्यामुळे याबद्दल माहिती घेऊन रखडलेल्या योजनेबाबत काही करता येईल का, याचा विचार करण्यात येईल.
– संजय धनशेट्टी
सार्वजनिक आरोग्य अभियंता, महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT