मोहोळ ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-मंगळवेढा मार्गावर बेगमपूरजवळ भरधाव मालट्रकने कारला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जण गंभीर झाले. सुनील बनसिद्ध वाघमारे (वय 31, रा. टिळक नगर, मजरेवाडी सोलापूर) असे मृताचे नाव आहे.
गिरीश ब्रह्मदेव माने, हर्षवर्धन मलिक सर्वगोड (दोघे रा. गजानननगर मजरेवाडी सोलापूर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री एक वाजता ही दुर्घटना घडली. घटनेची नोंद कामती पोलिसात झाली.
याबाबत कामती पोलिसांकडून माहिती अशी, सोलापूर येथील गिरीश माने, हर्षवर्धन सर्वगोड व सुनील वाघमारे हे एकमेकांचे मित्र आहेत. ते खासगी कामासाठी चारचाकी कारने (एमएच 13 डीटी 1891) सांगोला येथे गेले होते. मंगळवारी ते तिघेही सोलापूर-मंगळवेढा मार्गाने सोलापूरकडे परतत होते.
मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांची कार बेगमपूरच्या शिवारात आली होती. त्यावेळी सोलापूरहून मंगळवेढ्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या मालट्रकने (एमएच 13 डीक्यू 1270) त्यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात सुनील वाघमारे हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. गिरीश माने आणि हर्षवर्धन सर्वगोड हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक जागेवर सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच कामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी सोलापूरला पाठविले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कामतीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. या प्रकरणी हर्षा कुमार कांबळे यांनी कमती दिलेल्या फिर्यादीनुसार मालट्रकच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.