Uncategorized

बचतगटांनी उत्पादित वस्तूंचे ऑनलाईन मार्केटिंग करावे

backup backup

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा बचत गटांचे खूप चांगले पदार्थ तयार होत आहेत. मात्र त्यांचे मार्केटिंग होत नाही. बचत गटांनी नावीन्यपूर्ण कामाने इतरांपेक्षा वेगळे पदार्थ तयार करून त्याचे ऑनलाईन मार्केटिंग करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत नियोजन भवन येथे बँकर्सच्या कार्यक्रमात श्री. स्वामी बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, बँक इंडियाचे उपविभागीय व्यवस्थापक अरूण प्रकाश, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रिय व्यवस्थापक दत्तात्रय कावेरी, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नितीन शेळके, जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक संतोष कोलते उपस्थित होते.

धोत्रे म्हणाले, बँकांच्या सहकार्याने बचत गटांचे काम सुरू आहे. जिल्ह्यात 21 हजार 427 बचत गट असून सुमारे 2 लाख 37 हजार 500 महिला कार्यरत आहेत. वसुलीचे प्रमाण चांगले ठेवल्याने उमेद अभियानामध्ये जिल्ह्याचा राज्यात पहिला नंबर आला. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वत:सह कुटुंबाची प्रगती साधावी. आझादी का अमृत महोत्सव हा देशातील नागरिकांना समर्पित केलेला आहे. देशातील नागरिकांनी आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन श्री. प्रकाश यांनी केले.

नाशिककर यांनी सांगितले की, गरीब कल्याण योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व बँका प्रयत्न करीत आहेत. शेतकर्‍यांना खरीप पीक कर्जाचे वाटप उद्दिष्टांच्या 123 टक्के केले आहे. रब्बीमध्ये सध्या 62 टक्के झाले आहे. हेही उद्दिष्ट पूर्ण होईल. मुद्रा योजनेत 2 लाख 22 हजार 228 खातेधारक असून 1183 कोटी रूपये मंजूर आहेत. आतापर्यंत 1158 कोटी रूपये लाभार्थ्यांना वाटप झाले आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये जिल्ह्यातील 15 लाख 29 हजार 875 खाती आहेत. सर्व बँकांनी बचत गट, शेतकरी, मुद्रा योजना यांना कर्ज देताना प्राधान्याने विचार करण्याचे आवाहन केले. शेळके म्हणाले, बँकांनी नाबार्डमार्फत शेतकर्‍यांना शेतीशी निगडित कामासाठी पतपुरवठा करावा. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज विकसित होणे अत्यावश्यक आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे श्री. कावेरी यांनी नागरिकांनी कर्ज घेऊन ती नियमितपणे परतफेड करायला हवी, असे सांगितले.

कोलते यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना आत्मनिर्भर करणे शासनाचे धोरण आहे. 18 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवकांना 15 ते 35 टक्के सबसिडी देऊन कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणली आहे. याचा लाभ युवकांनी घ्यावा. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज मंजूर पत्रांचे वाटप लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बँक महाराष्ट्रच्या वतीने 118 बचत गटांच्या महिलांना दोन कोटी 40 लाख रूपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. इतर बँकांनी 60 बचत गटांना एक कोटी 20 लाख रूपयांचे वाटप केले. याशिवाय वैयक्तिक 110 उद्योजकांना 6 कोटी 90 लाख रूपयांच्या धनादेशाचे, मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले. बँकेमध्ये उत्कृष्ट काम करणारे बँक मित्र, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

बचत गटांना विविध बंँकांकडून 9 कोटींचे वाटप

जिल्ह्यातील बचत गटांना तसेच वैयक्तीम सभासद महिलांना विविध बँकेचे वतीने 9 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. बँक महाराष्ट्रच्या वतीने 118 बचत गटांच्या महिलांना दोन कोटी 40 लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. इतर बँकांनी 60 बचत गटांना एक कोटी 20 लाख रुपयांचे वाटप केले. याशिवाय वैयक्तिक 110 उद्योजकांना 6 कोटी 90 लाख रूपयांच्या धनादेशाचे, मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.

SCROLL FOR NEXT