Uncategorized

बकरी ईदला कुर्बानी न करता मुस्लिम बांधव करणार वारकर्‍यांचे स्वागत

Sonali Jadhav

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने यात्रेनिमित्त दोन दिवस मांसविक्रीची दुकाने बंद ठेवून बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करता, आषाढी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपुरात येणार्‍या वारकर्‍यांचे स्वागत करण्याचा निर्णय पंढरपूर येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. दरवर्षी आषाढी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते. औरंगाबादसह परिसरातील गावांमधून निघालेल्या दिंड्यांसह लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येतात़, यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुराला यात्रेचे स्वरूप येत असते. या वर्षी रविवारी आषाढी यात्रा व बकरी ईद एकाच दिवशी आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानचे पदाधिकारी व मुस्लिम बांधवांची बैठक घेतली. त्यानंतर दुपारी पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत आषाढी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी मुस्लिम बांधवांनी एकजूट दाखवीत शनिवार व रविवारी या दोन्ही दिवशी पंढरपूर येथील मांसविक्रीची दुकाने बंद ठेवून ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला. बैठकीला विठ्ठल-रुक्मिणी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, माजी सरपंच शेख अख्तर, महेबूब चौधरी, जामा मस्जिदचे आमिर सलीम पटेल, इमाम मुफ्ती अब्दुल अलीम, हापीज अब्दुल रशीद, हापीज असलम, हापीज एकबाल, हापीज मुश्ताक, बापू पठाण, ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख, अक्रम पटेल, जावेद शेख, दादासाहेब जाधव, शोएब
चौधरी आदींची उपस्थिती होती.

SCROLL FOR NEXT