मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका-टिप्पणी करण्याऐवजी देश वाचविण्यासाठी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहन काँग्रेसचे विधिमंडळ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी केले.
'काँग्रेसची सध्याची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे', असे विधान अलीकडे शरद पवार यांनी केले होते. त्यावर मौन बाळगलेल्या काँग्रेसने अखेर मौन सोडून पवार यांचा मुद्दा खोडून काढला. पवार यांच्या विधानाशी आपण असहमत असून काँग्रेसने कधीही जमीनदारी केली नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. संकटात आलेली लोकशाही विचारधारा व राज्यघटना वाचविण्यासाठी शरद पवार यांच्यासह पुरोगामी विचारांच्या सर्वांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कमाल जमीन धारणा कायदा आला आणि उत्तर प्रदेशातील जमीनदारांच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे तशीच राहिली. या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद मात्र त्यांच्यात नाही. सकाळी जमीनदार उठतो आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवे पीक दिसते.
हे सर्व हिरवे पीक माझे होते, असे सांगतो. माझे होते, आता मात्र नाही, असा त्या म्हणण्याचा अर्थ असतो. हा दाखला देत पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर भाष्य केले होते. त्यावर काँग्रेसने प्रत्युत्तर देणे टाळले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही 'नो कोमेंट' म्हणत प्रतिक्रिया देणे टाळले होते. अखेर दोन दिवसांनी थोरात यांनी प्रत्युत्तर दिले.