सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा पद्मशाली समाजाच्या अध्यक्षपदाची अखेर अपेक्षेप्रमाणे सुरेश फलमारी यांची रविवारी एकमताने निवड करण्यात आली. यानिमित्त तीन वर्षांपूर्वी दिलेल्या शब्दाचे पालन झाल्याचे यावेळी दिसून आले. संस्थेचे मावळते अध्यक्ष महेश कोठे यांच्या अध्यक्षतेखाली मार्कंडेय मंदिरात वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. दर तीन वर्षांकरिता पद्मशाली ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष निवडला जातो. तीन वर्षांपूर्वी समाजातील बडे राजकीय प्रस्थ्य असलेल्या माजी महापौर महेश कोठे यांची सलग दुसर्यांदा अध्यक्षपदी निवड झाली होती, त्यावेळी फलमारी हेदेखील इच्छुक होते, मात्र, त्यावेळी फलमारी यांनी पुढच्या वेळी अध्यक्ष करण्याचा समझोता झाला होता. यानुसार दिलेल्या शब्दाचे पालन होणार की नाही याविषयी उत्सुकता होती. रविवारी सभेत अखेर अपेक्षेप्रमाणे फलमारी यांची निवड करण्यात आली.
या पदासाठी अशोक इंदापुरे, बालराज बोल्ली, गणेश पेनगोंडा हेदेखील इच्छुक होते. यावर मावळते अध्यक्ष कोठे, विश्वस्त अंबाजी गुर्रम, जनार्दन कारमपुरी, रामकृष्ण कोंड्याल, नरसय्या इप्पाकायल, मुरलीधर आरकाल यांना निवडीचे अधिकार देण्यात आले. 14 कार्यकारिणी सदस्यांची निवड सभेत राजमहेंद्र कमटम, संतोष सोमा, राजाराम गोसकी, शंभय्या वडलाकोंडा, राम गड्डम, चक्रधर अन्नलदास, अंबादास श्रीमल, श्रीहरी बिल्ला, सिद्धेश्वर आंबट, दयानंद आडम, श्रीधर सुरा, शिवराज मेरगू, गणेश बुधारम, श्रीनिवास इप्पाकायल अशा 14 जणांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान, सभेत संस्थेच्या गत तीन आर्थिक वर्षांच्या वार्षिक अहवालाला तसेच उत्पन्न-खर्च पत्रकाला चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. यावेळी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
गणेश पेनगोंडा यांच्या प्रश्नावरुन खळबळ
या सभेत सदस्य गणेश पेनगोंडा यांनी उत्पन्न-खर्च पत्रकावर चर्चा करताना संस्थेसंबंधी एका विषयाकडे लक्ष वेधत गैरव्यवहाराचा आरोप केला. जर गैरव्यवहार झाला नसेल तर त्याचा हिशेब ताळेबंदमध्ये कुठे आहे? असा सवाल करीत त्यांनी सभेत खळबळ उडवून दिली. अध्यक्षपद निवडीनंतर सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे आयत्या वेळचे विषय मांडण्याची संधी अनेकांना मिळू शकली नाही.