सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा : दारू पिऊन घरी येऊ नका, पिऊन उधारी करू नका, असे पत्नीने म्हटल्याच्या कारणावरून नवर्याने रागात शिवीगाळ करत चुलीतील पेटत्या लाकडाने पत्नीस मारहाण केली. तसेच तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना दि. 15 जून रोजी रात्री गाताची वाडी (ता. बार्शी) येथे घडली. याबाबत जखमी पत्नी शीला परमेश्वर भोसले (45, रा. गाताची वाडी, ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. पती परमेश्वर मल्लिकार्जुन भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार शीला भोसले या घरी स्वयंपाक करत असताना पती गावातून दारू पिऊन आला. तेव्हा त्यास तुम्ही जास्त दारू पिऊन घरी येऊ नका, अशी विनंती केली. शिवाय दारूची उधारी जास्त करू नका असे सांगितले. तेव्हा पतीला राग आल्याने चुलीतील जळत्या लाकडाने पत्नीच्या अंगावर विविध ठिकाणी मारहाण करून जखमी केले. त्यावेळी मुलगी अमृता सोडविण्यास येताच तिलाही ढकलून दिले. तुला आता जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून मारण्यासाठी पती अंगावर धावून गेला होता. गावातील लोकांनी शीला भोसले यांना ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. याबाबत बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.