पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांना ताताडीने अटक करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचे प्रकरण देशभर आणि देशाच्या बाहेरही तापलेले आहे. देशात आणि महाराष्ट्रात मुस्लिम बांधवांचे विराट आणि अतिविराट मोर्चे निघत आहेत. नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्याविषयी प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर शहर आणि तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी जारोंच्या संख्येंने काढला.
देशभरातील मुस्लिम समाज आक्रमक झालेला असून, नुपूर शर्माच्या वक्तव्याचा मुस्लिम देशांनीही निषेध व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाने केवळ त्यांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधाने करणार्या नुपूर शर्मा तसेच सहभागी असलेल्या सर्वाना तातडीने अटक करावी, त्यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणार्याविरुद्ध कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सदर प्रकरणी कारवाई करण्यासाठी राज्यभर मोर्चे निघाले असून, नुकताच सोलापूर येथे मुस्लिम समाजाचा भव्य मोर्चा निघाला होता आणि सोमवारी पंढरपूर येथे निघालेल्या भव्य मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पंढरपूर तालुका व शहर मुस्लिम समाज आणि स्टेशन मस्जिद यांच्या वतीने पंढरपूर शहरातून आज जंगी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा पंढरपूर तहसील कार्यालयावर धडकला आणि आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात अॅड. यासिन शेख, नगरसेवक बोहरी, डॉ. आरिफ बोहरी, मोहम्मद वस्ताद, फारुख बागवान, बशीर तांबोळी, फिरोज शेख, जावेद शेख, अमीर खान, मस्जिद शेख यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते.