Uncategorized

नियोजन मंडळाचा आराखडा 682 कोटींचा

backup backup

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सोलापूर जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 मधील सर्वसाधारण योजनेसाठी 527 कोटी, अनुसूचित जाती योजनेसाठी 151 कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आदिवासीसाठी योजना यासाठी 4.28 कोटी, असे एकूण 682.28 कोटी निधी अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी कामाच्या याद्या अंतिम करून प्रशासकीय मंजुरीबाबतची कार्यवाही वेळेत पूर्ण करून 100 टक्के निधी खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले की, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी शेड, वस्त्यांना जोडणारे रस्ते, ग्रामीण रस्ते विकास व इतर जिल्हा मार्ग विकास इत्यादी मुलभूत पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. शासनाने ग्रामविकास विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 साठी सोलापूर जिल्ह्यासाठी 499 कि.मी.चे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यासाठी 374.25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-23 व 2023-24 या दोन वर्षांसाठी 100 कोटी (प्रतिवर्ष 50 कोटी) निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे भरणे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यास मिळालेला संपूर्ण निधी मार्च 2022 अखेरीस 100 टक्के खर्च झाला आहे. तसेच सन 2022-23 साठी 682 कोटीचा निधी मंजूर असून, याबाबत सर्व शासकीय यंत्रणाकडून प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी देऊन आजच्या नियोजन समितीच्या बैठकीतील विषयांचेही वाचन केले.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी गोडसे यांनी सन 2022-23 जिल्हा वार्षिक योजना सर्वसासाधारणसाठी विभागनिहाय मंजूर निधीची माहिती दिली. यावेळी बैठकीला आमदार सर्वश्री बबनराव शिंदे, संजय शिंदे, राजेंद्र राऊत, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, शहाजीबापू पाटील, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, यशवंत माने, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, नारायण पाटील व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

समिती सदस्य यांच्या सूचना

यावेळी समितीचे सर्व सदस्य खासदार, आमदार व निमंत्रित यांनी विविध समस्या मांडून निधी मिळणे व विकास कामे होण्यासाठी सूचना मांडल्या. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी कपात करू नये, राष्ट्रीय महामार्गासाठी गौण खनिज वाहतूक करणार्‍यामुळे ग्रामीण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंतर्गत रस्ते खराब होत आहेत, ते संबंधित ठेकेदाराने दुरुस्त करून द्यावेत, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. सोलापूर शहरातील अशोक चौकात राष्ट्रीय महामार्ग यांनी तत्काळ कार्यवाही करावी, नियोजन समितीकडून शहरी भागाला निधी वाटपात न्याय द्यावा, जिल्ह्यात गौण खनिजाची रॉयल्टी घेतल्यास जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, जिल्ह्यात पर्यटन भवन व महिला बचत गट भवन, उद्योग भवनची निर्मिती करावी, वन क्षेत्रातून जाणार्‍या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वन विभागाने तत्काळ मान्यता देणे, सोलापूर महापालिकेच्या हद्दवाढ भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करणे, वीज वितरण कंपनीला डीपी खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देणे, याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

शहरात पर्यटन, बचत आणि उद्योगभवन उभारणार

सोलापूर शहर व जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन भवन तसेच महिला बचत गटाच्या मालाला विक्री केंद्र मिळावे, यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बचत भवन आणि उद्योगाला चालना देण्यासाठी उद्योग भवनची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाने तातडीने आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत.

SCROLL FOR NEXT