पुणे; पुढारी वृत्तसेवा: विद्यार्थ्यांमधील संशोधन आणि नवविचाराला चालना देणारी आविष्कार स्पर्धा दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा घेण्यात येणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या प्रयत्नातून 2006 पासून ही राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाची ही स्पर्धा 15 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये तसेच 25 ते 30 वर्ष जुन्या महाविद्यालयांमध्ये राबविण्यात यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
याबाबत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता आणि सिद्धता कक्षाच्या संचालक डॉ. सुप्रिया पाटील म्हणाल्या, 'ही स्पर्धा सुरुवातीला महाविद्यालय स्तरावर, त्यानंतर विभागीय स्तरावर, मग जिल्हा आणि त्यानंतर विद्यापीठ स्तरावर होते. विद्यापीठ स्तरावरून मग राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत पदवी अभ्यासक्रम शिकणारे, पदव्युत्तर, संशोधनाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापकदेखील सहभागी होऊ शकतात. यातील विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकांसोबतच शिष्यवृत्तीदेखील देण्यात येते.' 'या वर्षाअखेर यंदाची अंतिम स्पर्धा होणे अपेक्षित आहे. याबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येईल,' असे सहायक कुलसचिव श्रीकांत गायकवाड यांनी सांगितले.
मागील दोन वर्षे या स्पर्धा झाल्या नसल्याने यंदा मुलांना खूप मोठी संधी आहे. तसेच आयोजनाचा मानही आपल्याला मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत विद्यापीठाला आणखी उंचीवर न्यावे.
डॉ. संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठदरवर्षी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातून साधारण अकराशे विद्यार्थी तसेच प्राध्यापक या स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांनी केलेली अनेक चांगली व समाजोपयोगी संशोधने समोर आली आहेत.
– डॉ. सुप्रिया पाटील, संचालक, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ