Uncategorized

दुस-या टप्प्यातील ३७६ नमुन्यांपैकी एकही रुग्ण डेल्टा प्लस नाही

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत दोन टप्प्यांत झालेल्या कोरोना रुग्णांच्या नमुन्यांच्या चाचणीत एकही डेल्टा प्लस बाधित सापडला नाही. मुंबई महानगरपालिकेने कस्तुरबा रुग्णालयातील कोरोनाच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) करणार्‍या अत्याधुनिक यंत्राच्या आधारे केलेल्या तपासणीमध्ये ही माहिती उघड झाली.

मुंबई मनपाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांच्या 376 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, यापैकी 304 नमुने हे 'डेल्टा' उप प्रकारातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर नमुन्यांमध्ये 'नाईन्टीन-ए' उप प्रकारातील 2 आणि 'ट्वेन्टी-ए' उप प्रकारातील 4 नमुने आणि उर्वरित 66 नमुने हे सर्वसाधारण कोरोना विषाणूचे आहेत.

विशेष म्हणजे पहिल्या व दुसर्‍या अशा दोन्ही टप्प्यातील नमुन्यांमध्ये अतिवेगाने लागण होणार्‍या 'डेल्टा प्लस' या उपप्रकारातील एकही नमुना आढळून आलेला नाही, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

दरम्यान, 'डेल्टा' या उप प्रकारातील कोरोना विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, कोरोना नियमांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता मनपाने व्यक्त केली आहे.

* कस्तुरबामधील नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये पहिल्या टप्प्यातील (फर्स्ट बॅच) चाचण्यांचे निष्कर्ष गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आले होते.

* त्यानुसार कोरोनाबाधित 188 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात 128 रुग्ण हे 'डेल्टा' या उप प्रकारातील होते. तर इतर सर्वसाधारण कोरोना विषाणूने बाधित होते.

* पहिल्या टप्प्यातील आकडेवारीबाबत विश्लेषणात्मक निष्कर्ष नुकतेच हाती आले. त्यानुसार डेल्टाबाधित 128 नमुन्यांपैकी 93 नमुने हे मुंबईतील होते.

* या 93 रुग्णांपैकी 45 नमुने हे पुरुष रुग्णांचे, तर 48 नमुने हे स्त्री रुग्णांचे होते. तसेच या 93 व्यक्तींपैकी 54 व्यक्तींना म्हणजेच सुमारे 58 टक्के व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. तर उर्वरित 42 टक्के म्हणजेच 40 व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.

* 93 रुग्णांपैकी 47 रुग्णांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. ज्यापैकी 20 व्यक्तींनी पहिला डोस, तर 27 व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले होते. उर्वरित 46 रुग्णांनी लस घेतली नव्हती. लशीचे डोस घेतलेल्या 4 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज भासली.

* 93 रुग्णांच्या संपर्कातील 1 हजार 194 व्यक्तींची चाचणी झाली. ज्यापैकी केवळ 80 व्यक्तींना कोरोना झाल्याचे आढळून आले. तर 1 हजार 114 व्यक्तींना कोरोना झालेला नसल्याचे आढळून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT