Uncategorized

तेंचि रूप विटे देखिलें आम्ही

backup backup

संत ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत सोपानकाकांनी समाधी घेतल्यावर सर्वात धाकटी बहीण संत मुक्ताबाई तापीतीरी अंतर्धान पावल्या. 25 मे 2022 रोजी संत मुक्ताबाई यांचा 725 वा समाधी सोहळा साजरा झाला. त्यांचे समाधीस्थळ कोथळी-मुक्ताईनगर आणि मेहूण अशा दोन ठिकाणी दाखवले जाते. मुक्ताबाई इतर भावंडांप्रमाणे समाधी न घेता त्या गुप्त झाल्यामुळे या मंदिरांमध्ये त्यांच्या पादुका वा समाधी नसून मूर्ती आहे. दोन्ही ठिकाणांहून त्यांची पालखी आषाढीसाठी पंढरपूरला जाते.

आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूरला ज्या सात पालख्या शेवटी असतात, त्यात कोथळीतील संत मुक्ताबाई यांची पालखी सहाव्या क्रमांकावर असते. पालखी प्रस्थान ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला होते. कोथळी ते पंढरपूर अंतर साधारण 485 कि.मी. इतके असून, वाटचालीला 33-34 दिवस लागतात. कोथळीजवळच मुक्ताईनगरात मुक्ताबाईंचे नवीन मंदिर आहे. कोथळीत प्रस्थान झाल्यावर पहिला विसावा नवीन मुक्ताईनगर मंदिर येथे होतो. बीड येथे पालखीचे जोरात स्वागत होते. बीड येथे मुक्ताबाईंच्या पणजोबांची समाधी आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

आषाढ शुद्ध षष्ठीला पालखी पंढरपुरात पोहोचते. तेव्हा पालखीच्या स्वागतासाठी संत नामदेवांचे वंशज नामदासांची दिंडी येते. आषाढ शुद्ध दशमीला सर्व संतांच्या स्वागतासाठी पालखी वाखरी येथे जाते. एकादशीला चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिणा होते. पौर्णिमेला पालखी काल्यासाठी गोपाळपूरला जाते. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होतो. श्रावण शुद्ध चतुर्थीला पालखी पुन्हा कोथळीला परत येते.

श्रीक्षेत्र मेहूणवरूनही संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा पंढरपूरला जातो. पालखी प्रस्थान ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला होते. 37 दिवस प्रवास करून पालखी आषाढ शु. सप्तमीला पंढरपुरात पोहोचते. पौर्णिमेला काला झाल्यावर परतीचा प्रवास सुरू होतो. गेली काही वर्षे परतीच्या प्रवासात पालखी व रथ वाहनाने परत आणतात.

जळगावच्या श्रीराम मंदिरातूनही श्रीराम मुक्ताई पालखी सोहळा निघतो. पालखी प्रस्थान ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला होते. आषाढ शुद्ध दशमीला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचते. याशिवाय आळंदी येथून संत मुक्ताबाई यांचे दोन पालखी सोहळे गेल्या काही वर्षांत सुरू झाले आहेत. साधारण 6-7 वर्षांपूर्वी सोपानकाका वाल्हेकर यांनी सुरू केलेली मुक्ताबाई यांची पालखी आळंदीवरून निघते. ही पालखी ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीच्या पुढे काही अंतरावर चालते. 2019 पासून कृष्णा महाराज पारेकर यांनी सुरू केलेला आळंदी ते पंढरपूर मुक्ताबाई पालखी सोहळा माऊलींच्या सोहळ्यामागे चालतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT