Uncategorized

टाकवे बुद्रुक : मूलभूत सुविधांअभावी कंपन्यांचे होतेय स्थलांतर

अमृता चौगुले

 पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सोई सुविधा नसल्यामुळे अनेक कंपन्या स्थलांतरित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे परिसरातील युवकांच्या हातचा रोजगार जाऊ लागला आहे. दरम्यान, टाकवे बुद्रुक येथील औद्योगिक वसाहतीमध्ये पंचवीस वर्षांपूर्वी अनेक कंपन्या आल्या आहेत. त्यामुळे आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ परिसरातील अनेक युवकांना रोजगार उपलब्ध झाला. परिणामी युवकांना कायमस्वरूपी कंपनीमध्ये नोकरी उपलब्ध झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत येथील औद्योगिक वसाहतीतील तीन मोठ्या कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. परिणामी या कंपन्यांतील जवळपास नऊ ते दहा हजार युवकांचा रोजगार गेला.

या काळात कामगारांनी कंपन्या स्थलांतरित होऊ नये म्हणून अनेक राजकीय नेत्यांना याप्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी आणले असता त्यांनी भूमीपुत्रांना अनेक आश्वासने दिली. मात्र, ती आश्वासनेच राहून गेली. तसेच, या कंपन्यांवरती आधारित असणारे अनेक छोटे उद्योजक व छोटे वर्कशॉप बंद पडले. परिणामी युवकांच्या हाताचा रोजगार बुडाल्याने अनेक कुटुंबांची रोजीरोटी गेली.
परिणामी मावळमधील अनेक युवकांना आपले कुटुंब स्थलांतरित करून पुणे-मुंबई सारख्या शहरी भागाचा आश्रय घ्यावा लागला आहे. हाताला मिळेल ते काम करण्यास युवकांनी सुरुवात केली. येथील कंपन्या स्थलांतरित होण्यास नक्की जबाबदार कोण, असा प्रश्न या युवकांच्या गेलेल्या रोजगारामुळे उपस्थित होत आहे.

कान्हे येथे रेल्वे ओव्हरब्रिज नसल्याने रेल्वे क्रॉसिंगमुळे या भागातून कंपन्यांचा होणारा ट्रान्सपोर्ट व कंपन्यांमध्ये येणारे कामगार यांना विलंब होतो. यामुळे औद्योगिक वसाहतमधील कंपन्यांवर आधारित कंपन्यांना वेळेवर माल न मिळाल्याने संबंधित कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाची मागील काही वर्षांपासून अनेकवेळा उद्घाटने झाली. परंतु, अद्याप परस्थिती 'जैसे थे' आहे.

टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक असल्याने अवजड वाहनास बंदी
काही स्थानिकांनी कंपनी व्यवस्थापनांना दमदाटी करून ठेकेदारी मिळवण्यासाठी प्रयत्न केला. स्थानिक ग्रामपंचायती कंपन्यांकडून कर घेण्यासाठी अग्रेसर असतात. मात्र, ग्रामपंचायतीकडून कंपन्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाकडून नाराजीचे व्यक्त करण्यात आली आहे.

ज्या कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत. त्या ठिकाणी नवीन कंपन्यांना याठिकाणी प्लान्ट सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. येथील मुख्य रस्त्यालगत अनेकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र, त्या ठिकाणी काहीही होत नसल्याने रोजगार निर्माण होण्यासाठी कंपन्या सुुरू होणे गरजचे आहे. यासाठी विधानसभेत तसेच लोकसभेत लोकप्रतिनिधींनी आवाज उठवणे गरजेचे आहे. टाकवे बुद्रुक या ठिकाणी एमआयडीसी सुरू झाल्यास शंभर ते दीडशे गावातील भूमी पुत्रांना रोजगार उपलब्ध होवू शकेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT