सोलापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली 0 ते 18 वयोगटातील मुलांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय आणि सुश्रुत हॉस्पीटल बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने शुकवारी बार्शी, माढा, वडाळा, मोहोळ, करमाळा या तालुक्यातील संशयित हृदयरोगाचे 200 मुलांची मोफत टू-डी ईको तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गुंड यांनी दिली.
शिबिरासाठी बालाजी हॉस्पीटल, मुबंई येथील प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. भूषण चव्हाण, त्यांचे सहकारी प्रतिक मिश्रा उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालय बार्शी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.शितल बोपलकर, सुश्रुत हॉस्पीटलचे डॉ.अंधारे यांनी प्रयत्न करून शिबीराचे आयोजन केले होते. ह्रदयरोग शस्त्रक्रियेची गरज असणार्यांची शस्त्रकिया बालाजी हॉस्पीटल, मुंबई तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एकूण 4753 अंगणवाड्यातील मुलांची वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी केली जाते. एकूण 4109 शाळेतील मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होतेे. जन्मत: व्यंग, पोषण द्रव्याची कमतरता, शारिरीक व मानसिक विकासात्मक बदल, शस्त्रक्रिया तसेच विविध आजारावर उपचार व निदान या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविले जातात.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एप्रिल 2022 ते आजतागायत 42 हृदयरोग व 80 इतर शस्त्रक्रिया मोफत झाल्या. आजतागायत 1240 मुलांच्या हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ज्या मुलांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांच्या पालकांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकांशी संपर्क साधण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत घोंगडे यांनी केले आहे.
दरवर्षी अंगणवाड्या आणि प्राथमिक शाळेतील हजारो मुलांची तपासणी होते. तसेच तातडीच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात
– डॉ.प्रदिप ढेले
जिल्हा शल्य चिकीत्सक सोलापूर