Uncategorized

घरेलू कामगारांच्या योजनेबाबत लढा देणार : नरसय्या आडम

backup backup

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारने घरेलू कामगारांसाठी जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे या कामगारांची उपेक्षा कायम आहे. विद्यमान सरकारने तरी याची अंमलबजावणी करावी; अन्यथा लढा उभारणार, असा इशारा कामगार नेते नरसय्या आडम यांनी दिला. 'सीटू'तर्फे घरेलू कामगारांसाठी आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी पुरोगामी विचारवंत प्रा. अजित अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आडम पुढे म्हणाले, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण' योजनेतून घरकाम करणार्‍या महिलांची नोंदणी तसेच त्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी बीजभांडवल म्हणून 250 कोटी रुपये जाहीर केले. जमा होणार्‍या एकूण निधीतून घरेलू कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतील, अशी घोषणा केली.

मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. या कामगारांना किमान दरमहा 10 हजार वेतन व दिवाळीला एक महिन्याचे सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे; अन्यथा रस्त्यावरची लढाई अटळ आहे. यावेळी प्रा. अजित अभ्यंकर म्हणाले की, आज केंद्र सरकार कामगार व जनताविरोधी धोरणे राबवताना कामगारांनी रक्तरंजित क्रांती घडवून मिळवलेले कायदे पायदळी तुडवत आहेत. यावेळी व्यासपीठावर नलिनी कलबुर्गी, वसंत पवार, रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT