मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : विनामास्क प्रवास करणार्या महिलेवर कारवाई करत असलेल्या क्लीन अप मार्शल ला गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेणार्या चालकाविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चालक नवी मुंबईतील रहिवासी असून गाडी नंबरच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुंबईमधील एका क्लीन अप मार्शल ला एका चालत्या गाडीच्या बोनेटवरून नेले जात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. सांताक्रूझमध्ये बुधवारी हा प्रकार घडला आहे. येथील हनुमान टेकडी परिसरात राहात असलेला सुरेश पवार (36) हा मागील 2 वर्षांपासून क्लीन अप मार्शल म्हणून काम करत आहे. बुधवारी सिग्नलवर ऑन ड्युटी कर्तव्य बजावत असताना एका कॅबमध्ये त्याला विनामास्क प्रवास करत असलेली महिला दिसली.
नियमाप्रमाणे पवार याने तिला 200 रुपये दंड भरायला सांगितला. ही महिला दंड भरायला तयारही झाली. पण मुजोर कॅब चालक हुज्जत घालायला लागला. पवार त्याला गाडी बाजूला घेण्याची विनंती करत होते. त्याने ही विनंती धुडकावून लावली. त्याने गाडी सुरू केली आणि गाडीचा धक्का बसून पवार गाडीच्या बोनेटवर आडवे पडले. सुदैवाने त्याला दुखापत झाली नाही.
कॅब चालकाने त्याला तशाच अवस्थेत काही अंतर पुढे नेऊन कार थांबवली. चालकाच्या वागणुकीमुळे तो हादरला होता. तो बाजूला सरकताच चालक गाडी घेऊन पसार झाला. असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता, असे पवार याने याबाबत बोलताना सांगितले. दरम्यान, रस्त्यावर उपस्थित असलेल्या एका बाईकस्वाराने हा सारा प्रकार कॅमेर्यामध्ये टिपला. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.