कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे पाणी पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही. तारीख पे तारीख देऊन जनतेला मुर्ख समजू नका, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मंत्री मुश्रीफ सध्या गडबडले असल्याची टीकाही त्यांनी केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी रुईकर कॉलनी येथे 'कॉफी पे चर्चा ' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे उमेदवार सत्यजित कदम, सहजसेवा ट्रस्टचे अध्यक्ष सन्मती मिरजे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरकरांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवले.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढच्या दिवाळीला कोल्हापूरकरांची अंघोळ थेट पाईपलाईनद्वारे येणार्या पाण्याने करता येईल, अशी घोषणा केली होती; पण मुळात थेट पाईपलाईनचे पाणी पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही, असा टोला त्यांनी लगावला. थेट पाईपलाईनच्या कामात गुणवत्ता, त्रुटी यासारखे अनेक मुद्दे आहेत. त्याचीही जबाबदारी पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री घेणार का, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.
माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, महापालिकेत सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहराची फरफट केली. हद्दवाढ केली नाही, शुद्ध पाणीपुरवठा नाही, चांगले रस्ते नाहीत. उलट कोल्हापूरकरांच्या माथी टोलचा भुर्दंड मारला; पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी 473 कोटी रुपये देऊन कोल्हापूर टोलमुक्त केले.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्या, असे आवाहन सत्यजित कदम यांनी केले. यावेळी प्रशांत घोडके, धनाजी साळोखे, नितीन पाटील, समीर शेट, संजू परीख, विजेंद्र माने, अनिल हिराणी, दिलीप लडगे, सुरेश भिवटे, महावीरअण्णा गाट, जयश्री गाट, धैर्यशील पाटील, प्रमोद देसाई, दीपक मिरजे, राजसिंह शेळके, दत्तात्रय इंगवले, आशिष ढवळे, सीमा कदम, उमा इंगळे आदी उपस्थित होते.