करमाळा : पुढारी वृत्तसेवा महागाई, बेरोजगारी तसेच जातीय तेढ निर्माण होण्यासाठी भाजपचे केंद्र सरकार खतपाणी घालत असल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने आयोजित करमाळा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती संयोजक गौतम खरात यांनी दिली. भारत बंद निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीत नागरिकांचा मोठा सहभाग होता. रॅलीची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरील अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत तहसील कार्यालय येथे रॅली नेण्यात आली. नायब तहसीलदार विजयकुमार जाधव आणि पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे भीमराव कांबळे, जमियत उलेमा ए हिंदचे सदर मौलाना मोहसीन शेख, छत्रपती क्रांती सेनेचे आर. आर. पाटील, बाबुराव पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे कय्युम शेख, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे भीमराव कांबळे, जिगर ग्रुपचे अमर शेख, सोहेल पठाण, इरफान शेख, शाहिद पठाण, आरिफ तांबोळी, मोहिद्दीन बागवान, सलमान घोडके, मोहसीन घोडके, इम्रान कुरेशी, साहिल कुरेशी, फिरोज शेख, बंडू शेख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे कादीर शेख, मैनुद्दीन शेख, जावेद मणेरी, राष्ट्रीय भटक्या-विमुक्त मोर्चाचे दिनेश माने, विनोद हरिहर आदी मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
रॅलीच्या समारोपावेळी मोहसीन शेख, भीमराव कांबळे, आर. आर. पाटील, कय्युम शेख, मौलाना कादीर शेख, गौतम खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन यशस्वी करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा करमाळा युनिटच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.