अकलूज : पुढारी वृत्तसेवा दिव्यांग व्यक्तींची जयपूर फूट, कृत्रिम हात, कुबड्या देऊन त्यांची जीवन जगण्याची जिद्द, चिकाटी, स्वावलंबन यासह त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनास अधिक बळ दिले आहे, असे प्रतिपादन जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
रोटरी क्लब अकलूज आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने अपंग नागरिकांना आवश्यक साहित्यांचे वाटप सहकारमहर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील व रोटरी डिस्ट्रिक्टचे माजी प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या हस्ते करण्यात आले. एमटीडीसी हॉल या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे म्हणाले, रोटरी क्लबने गतवर्षात सामाजिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. प्रास्ताविक माजी अध्यक्ष नितीन कुदळे यांनी केले. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या अधिष्ठाता नंदा ठाकूर, लाभार्थी शाहूराव कोकाटे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष अॅड. दीपक फडे, सचिव केतन बोरावके, सर्व सदस्य, जिल्हा संचालक यशवंत हांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सचिव गजानन जवंजाळ यांनी केले. आभार दीपक फडे यांनी मानले. दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम साहित्य बसविण्यासाठी तज्ज्ञ राजेश माने, मनोज ओमप्रकाश, रामसुजान साकेत, अरमित सिंग यांचे विशेष सहकार्य लाभले.