सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा शाळेच्या पहिल्या दिवशी कुचन प्रशालेत विद्यार्थ्यांनी केक, चॉकलेटचा आस्वाद घेत तसेच प्राण्यांचे मुखवटे घालून धमाल केली. या शाळेत प्रवेशोत्सवानिमित्त फुलांच्या रांगोळ्या, फुग्यांची कमान, प्रवेशद्वाराजवळ हिरव्या चटया, फुलझाडाच्या कुंड्या, विविध माहितीचे फलक, रंगीबेरंगी खडूंनी भरलेले फळे आदींचे आकर्षण होते. विद्यार्थ्यांचे प्रथम औक्षण करुन गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. फुलांनी सजवलेली शाळेची घंटा घणघणली आणि प्रसन्न वातावरणात परिपाठास सुरुवात झाली. नवप्रवेश विद्यार्थ्यांचे बहुसंख्य पालकसुद्धा उपस्थित होते. प्राचार्य युवराज मेटे, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम यांच्या हस्ते विद्या देवता सरस्वतीचे पूजन करण्यात आले.
'सर्व शिक्षा' अभियान अंतर्गत इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच देण्यात आले. नवीन विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवसाचे आकर्षण म्हणजे विविध फलक लावलेली मोठी छत्री, केक व चॉकलेटनी भरलेला सरप्राईज बॉक्स या गोष्टी विशेष उल्लेखनीय ठरल्या. प्राचार्यांनी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी शालेय शिस्त पाळून अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांचे मुखवटे घालून धमाल केली. सूत्रसंचालन निर्मला शिंदे यांनी केले. सविता चिप्पा यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गाच्या वर्गशिक्षकांची ओळख करुन दिली. याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, पर्यवेक्षक जाहिदा जमादार, दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे आदी उपस्थित होते.