Uncategorized

कागल मध्ये नगरसेवक संख्या २३ होणार; गडहिंग्लजची संख्या पोहोचणार २२ वर

अमृता चौगुले

कागल मध्ये नव्याने तीन नगरसेवकांची वाढ होऊन वीसवरून 23 नगरसेवक होणार असल्याची शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

कागल नगरपालिका निवडणुकीचे वेध गेल्या वर्षभरापासून इच्छुक उमेदवारांना लागून राहिले आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपापली उमेदवारी निश्चित समजून जय्यत तयारी सुरू केली आहे. वाढदिवस, लसीकरण, विविध प्रकारचे कार्यक्रम, तसेच जेवणावळी, सहली यांच्या माध्यमातून इच्छुकांनी मार्केटिंग सुरू केले आहे. इच्छुकांची संख्या सध्यातरी सत्तारूढ गटांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. यंदाची निवडणूक राष्ट्रवादी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच होणार आहे. त्यासाठी पक्ष पातळीवर तयारी सुरू आहे.

शासन पातळीवर प्रभाग रचनेबाबत अद्याप कोणत्याही सूचना आल्या नसल्याने प्रभाग रचनेचे काम सुरू झालेले नाही. निवडणुका घेण्यासंदर्भात एकवाक्यता नसल्याने निवडणुका कशा होणार? एक सदस्यीय होणार की, बहुसदस्यीय होणार, याबाबत शंका निर्माण झाली आहे. शासनाचा पहिला निर्णय होता की, प्रत्येक वॉर्ड स्वतंत्र करा, नंतर बहुसदस्यीय प्रभाग करा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, अशी पालिका वर्तुळातून माहिती देण्यात आल्यामुळे सध्यातरी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कागल शहरात सध्या दहा वार्ड आहेत आणि नगरसेवकांची संख्या 20 आहे. दोन स्वीकृत नगरसेवक आहेत. शहराची लोकसंख्या एकूण 34 हजार 106 इतकी आहे. मतदारसंख्या 25 हजार 569 इतकी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार गेल्या वेळच्या निवडणुकीचे वॉर्ड रचना झालेली आहे. शहराच्या हद्दवाढीनंतर दुसर्‍यांदा निवडणूक होणार आहे. सध्या प्रभागवाढीबाबत सुरू असलेल्या चर्चेवरून शहरातील प्रभागांमध्ये वाढ होऊन त्यामध्ये तीन नगरसेवकांची वाढ होईल, अशी चर्चा आहे.

गडहिंग्लजची संख्या पोहोचणार 22 वर

गडहिंग्लज ः पुढारी वृत्तसेवा
राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजूर केला. या नव्या निर्णयामुळे गडहिंग्लज पालिकेतील नगरसेवकांची संख्या 19 वरून 22 वर पोहोचणार असून, स्वीकृतचे दोन सदस्य मिळून एकूण 24 जण सभागृहात असणार आहेत.

नव्या वाढलेल्या सदस्यांमुळे 9 प्रभागांऐवजी प्रत्येकी 2 असे 11 प्रभाग अस्तित्वात येतील. या नव्या रचनेमुळे शहराची मतदारसंख्या तेवढीच राहणार असली, तरी नवे दोन प्रभाग अस्तित्वात येणार असल्याने अन्य प्रभागांतील मतदारसंख्या कमी होणार आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीवेळी गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये केवळ 17 नगरसेवक व दोन स्वीकृत असे 19 नगरसेवक सभागृहात होते. दरम्यान, गडहिंग्लज शहराची हद्दवाढ झाली व मोठे भोगौलिक क्षेत्र पालिकेच्या हद्दीत आले. याचा परिणाम म्हणून नगरसेवक संख्या 19 वर, तर स्वीकृत दोन अशी मिळून सदस्य संख्या 21 वर पोहोचली आहे. यापूर्वी 17 सदस्य संख्येवेळी सात प्रभागांमध्ये दोन, तर आठव्या प्रभागात 3 अशा 17 जागा होत्या. नव्या निर्णयामुळे नगरसेवकांची संख्या 22 वर पोहोचल्याने आता प्रत्येकी दोन संख्येनुसार 11 प्रभाग होणार आहेत. नवे दोन प्रभाग अस्तित्वात आल्याने प्रत्येक प्रभागात होणारी मतदार संख्या घटणार आहे. साहजिकच याचा फायदा उमेदवारांना होणार असून, प्रभाग रचना कमी झाल्याने उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. त्यामुळे आगामी काळात या निर्णयाचे पडसाद पाहावयास मिळू शकतात.

पक्षीय वजन वाढले

नव्या रचनेनुसार शहरात 22 नगरसेवक होणार असून, यासाठी अकरा प्रभाग अस्तित्वात येणार असल्याने पक्ष संघटनांची ताकद यासाठी फायदेशीर होणार आहे. दुसरीकडे प्रभागातील मतदार संख्या कमी झाल्याने काही अपक्ष डोके वर काढू शकतात; मात्र निवडणुकीच्या दणक्यात पक्ष संघटनेला महत्त्व येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT