Uncategorized

औरंगाबाद : शिक्षक प्रतिनियुक्तीवर, वस्तीशाळा वार्‍यावर

मोहन कारंडे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : 'आम्हांला शिकविण्यासाठी शिक्षक द्या,'असा टाहो फोडत खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथील वस्तीशाळेतील चिमुकले विद्यार्थी सोमवारी (दि.22) थेट जिल्हा परिषदेत धडकले. या मुलांनी सीईओंच्या दालनासमोरच ठाण मांडले. सीईओ जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला असल्याने शिक्षणाधिकार्‍यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. खुलताबाद शहरापासून सुमारे 30 किलोमीटरवर असलेल्या रेणुकानगरगोळेगाव येथे पहिली ते चौथीपर्यंतची वस्तीशाळा आहे. या वस्तीशाळेत सुमारे 35 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

द्विशिक्षकी असलेल्या या शाळेवर एकच शिक्षक कार्यरत आहे, तर दुसरे शिक्षक हे गेल्या चार वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांच्या जागी पर्यायी शिक्षक दिलेला नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सन 2019 पासून शिक्षकासाठी पाठपुरावा करत आहे, मात्र कार्यवाहीच होत नसल्याने आज मुलांना व पालकांना घेऊन जिल्हा परिषदेत आल्याचे सरपंच संतोष जोशी यांनी सांगितले. यावेळी भाजपचे माजी जि. प. उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, सदस्य सुरेश सोनवणे यांनी मुलांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत प्रश्न उपस्थित करत, प्रशासनाला धारेवर धरले. प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शाळेवर पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करण्याबाबतचे पत्र त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे लवकरच शिक्षकाचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त करत, मुले व पालकांनी जिल्हा परिषद सोडली.

जिल्हा परिषदेचे 38 शिक्षक हे प्रतिनियुक्तीवर महसूल विभागात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. शासनाच्या विविध योजना व कामांची जबाबदारी पार पाडण्यासाठी ते प्रतिनियुक्तीवर आहेत, मात्र त्यांची मूळ नियुक्ती शाळेवर आहे. त्यामुळे अशा अडचणी सोडविण्यासाठी माहिती घेण्यात येत आहे. त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था करत असल्याचे जि.प.चे सीईओ तथा प्रशासक नीलेश गटणे यांनी सांगितले.

मोक्याची शाळा न मिळाल्यास प्रतिनियुक्तीचा मार्ग अवलंबून अनेक शिक्षक शहर जवळ करतात. शिक्षक म्हणून नोकरीत रुजू झालेले आणि प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी दोन-पाच वर्षे राहिल्यानंतर कारकुनी कामात हुशार झाले आहेत. त्यामुळे त्या कार्यालयातील प्रमुखही त्यांना पुन्हा मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्यास तयार होत नाहीत. परिणामी शिक्षकांची नियुक्ती मात्र शाळेवर असल्याने, त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांमुळे एक-दोन शिक्षकी शाळांतील विद्यार्थी वार्‍यावर असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT