Uncategorized

औरंगाबाद : लग्नातील राड्यानंतर वधुने वराला दिला नाकार; दारुड्या वऱ्हाडींना मिळाला चोप

अमृता चौगुले

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : गांधेली येथील लग्नात बुधवारी (दि. 15) मोठा राडा झाला. मुंबईहून आलेल्या वऱ्हाडातील दारू पिलेले तरुण गावकऱ्यांना नडल्यामुळे नवरदेवासह वऱ्हाडींना बेदम चोप देण्यात आला. त्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली. धक्कादायक म्हणजे लग्नानंतर नवरदेवाने नवरीला नाकारले. त्यामुळे त्यांना पुन्हा पळून-पळून बेदम मारहाण केली. अखेर, नवरीनेही त्या नवरदेवासोबत संसार करण्यास नकार देऊन लग्न मोडल्याचे जाहीर केले. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता त्याच मंडपात नात्यातील एका तरुणासोबत तिचे लग्न लावले.

गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या विक्रोळीतील बच्छीरे कुटुंबातील मुलाचा पारध (ता. भोकरदन, जि. जालना) येथील पदवीधर तरुणीशी विवाह ठरला. मुलीचे कुटुंबिय पारधचे असले तरी तेही मुंबईतच राहतात. दरम्यान, मुलीची एक बहीण गांधेली येथे राहते. त्यामुळे लग्न गांधेलीत करण्याचे नियोजन केले. त्याप्रमाणे वधूकडील मंडळी आधीपासूनच गांधेलीत आले होते. बुधवारी मुंबईहून वऱ्हाड आले. दुपारी 12.35 वाजताच्या मुहूर्तावर लग्न ठरले होते. नवरदेवाची वरात निघणार तोच त्याचे मुंबईचे मित्र येथेच्छ दारू पिऊन गोंधळ घालू लागले. ते गावकऱ्यांचेही ऐकत नव्हते. दुपारी तीन वाजले तरी लग्न लागले नव्हते. त्यानंतर कसेबसे लग्न लागले.

लग्नातील स्वयंपाकावरून वाद

लग्नानंतरही नवरदेवाचे नखरे सुरुच होते. स्वयंपाकावरून त्याने मानापामानाचे नाट्य सुरु केले. बोलता-बोलता वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. मुंबईच्या वऱ्हाडात तरुणांची संख्या अधिक असल्याने त्यांनी नवरीचा मेव्हुणा, आजोबा यांना मारहाण केली. दोन महिलांचे डोके फोडले. त्यांचा धिंगाणा नंतर वाढतच गेला. स्थानिकांचा त्यामुळे पारा चढला आणि सगळ्यांना चोप दिला. त्यात दगडफेक झाल्याने वऱ्हाड घेऊन आलेली ट्रॅव्हल्स आणि इतर सर्व वाहनांची तोडफोड झाली. गावातील काही स्थानिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवले.

अन नवरीने दिला नकार

नवरीच्या पाठवणीची वेळ झाली. तेव्हाही नवरदेव आणि त्याच्या मद्यपी मित्रांचा गोंधळ सुरुच होता. नवरीच्या नातेवाईकांच्या दबावात नवरीला घेऊन गेले असते, मात्र अशा नवऱ्यासोबत नांदण्यास नवरीनेच नकार दिला. त्यामुळे मुंबईच्या वऱ्हाडींना फटके देऊन परत पाठवुन दिले. या घटनेची चिकलठाणा ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आत्याच्या मुलाशी लग्न

वऱ्हाडाने घातलेला गोंधळ, लग्नात झालेला राडा आणि नवरीला सोडून निघून गेलेले वऱ्हाड हा नाट्यमय प्रकार घडल्यानंतर आता या नवरीचे लग्न मोडल्याने नातेवाईक चिंतेत होते. मात्र, अन्य नातेवाईकांच्या मदतीने रात्री साडेनऊ वाजता नवरीच्या आत्याच्या मुलाशी तिचे लग्न लावले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

SCROLL FOR NEXT