सोलापूर : सोलापुरातील उत्सव साजरे करताना कायदा हातात घेणार्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले. सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयामध्ये मोहरम व साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये आयुक्त डॉ. माने बोलत होते. यावेळी सोलापूर पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी, महानगरपालिकेकडील अधिकारी, आरटीओचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी व उत्सव समिती पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी प्रास्तावीक करताना पंजाच्या मिरवणुकीस रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषण न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असेही आवाहन कडूकर यांनी केले. याप्रसंगी उत्सव समितीच्या पदाधिकार्यांनी महापालिकेशी संबंधित अडचणींचा पाढा वाचला व त्या अडचणी सोडविण्याची मागणी केली. याप्रसंगी उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कायदा हातात घेणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल
इतर धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे
कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा
शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची पोलिसांना माहिती द्यावी
मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये