Uncategorized

आष्टी, मोहोळमधील 9 गावांच्या पाण्याची सोय करा

Shambhuraj Pachindre

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

आष्टी उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण करून याद्वारे मोहोळ तालुक्यातील 9 गावांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मंजूरी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिले. भोगावती खो-यात पर्जन्यमान कमी असल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्याच्या भोगावती नदीकाठचा भाग सिंचनाखाली येण्यासाठी सीना नदीवरून भोगावती नदीचे पुनर्भरण करणे, सीना-भोगावती जोडकालव्याद्वारे जोडून भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यामध्ये पाणी सोडून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

सोलापूर जिल्ह्यातील सीना-भोगावती आणि आष्टी उपसा सिंचन योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाच्या सचिव शैला ए, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत हे उपस्थित होते. तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य अभियंता ए टी धुमाळ तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आष्टी उपसासिंचन योजनेतून मोहोळ तालुक्यातील 9 गावांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी आहे. येवती गावाजवळील तलावातून येवती तलावाच्या येव्यातून व उजनी (भीमा)च्या डाव्या कालव्यातून येवती तलावात पाणी घेऊन 1.55 अघफू पाणी आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील 15 गावे, माढा तालुक्यातील 2 गावातील क्षेत्रावर योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, नालबंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाची वाडी, अनगर या 9 गावांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी आहे. या योजनेस 0.58 अघफू पाणी उपलब्ध झाल्यानंतर या गावांतील 4590 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

भोगावती खो-यात पर्जन्यमान कमी असल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्याच्या भोगावती नदीकाठच्या क्षेत्रातील भाग सिंचनाखाली येण्यासाठी सीना नदीवरून भोगावती नदीचे पुनर्भरण करणे, सीना-भोगावती जोडकालव्याद्वारे जोडून पाणी भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यामध्ये सोडून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी देण्यासंदर्भात बार्शी व मोहोळ तालुक्यातून मागणी आहे. बार्शी तालुका हा आवर्शनप्रवण क्षेत्रात येत असल्याने भोगावती नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणे आवश्यक असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

SCROLL FOR NEXT