पिलीव : पुढारी वृत्तसेवा आषाढी वारीनंतर येणार्या पौर्णिमेनंतर आमावस्येपर्यंत गावोगावी श्री महालक्ष्मी देवी, मरी मातादेवी, म्हसोबा आदी गावदेवतांच्या यात्रा, जत्रा साजरा केल्या जात आहेत. पिलीव (ता. माळशिरस) येथील ग्रामदैवत मरी मातेच्या गाव यात्रेपासून पिलीवच्या सर्व सीमेवरती शिवार यात्रा साजरी केली जात आहे. पिलीवच्या जरग खोर्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून सीमेवरची जत्रा साजरी केली. दोन वर्षांपासून लॉकडाऊनच्या पाश्वर्र्भूमीवर बंद असलेली सीमेवरची जत्रा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ही जत्रा सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन लोकवर्गणी करून साजरी करतात. परंपरेप्रमाणे आठखुरी मेंढी, बोकड व कोंबड्याचा बळी दिला गेला.
ही पिलीव व चांदापुरी सीमेवरची यात्रा यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ काकडे, चेअरमन गोविंद भैस, माजी सरपंच संग्राम पाटील, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष कल्या बापू जावळे, महादेव जरग, सुनील खुर्द, मारुती पाटील, वैभव वगरे, शंकर काळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
जत्रेचा प्रारंभ संपूर्ण गावातून पोतराज व डोक्यावर कलश घेतलेल्या सुवासिनींची अजाबळी द्यावयाच्या आठखुरी मेंढीची वाजतगाजत देवीची गाणी म्हणत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील लोकांनी मुबलक पाऊस पडावा, रोगराई होऊ नये, साथीचे रोग होऊ नयेत म्हणून आराधना केली.