डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : बराक्यांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या जेलरसह त्यांच्या मदतीसाठी धावलेल्या शिपायावर दोघा कैद्यांनी मिळून धारदार हत्यारांनी वार केल्याची घटना कल्याणच्या आधारवाडी कारागृहात घडली. या हल्ल्यात जेलर आनंद पानसरे आणि शिपाई भाऊसाहेब गंजवे या दोघांना दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका गंभीर गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेले कैदी महम्मद अल्ताफ उर्फ आफताब खालिद शेख आणि अंकित महेंद्र प्रसाद या दोघा हल्लेखोरांच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जेलर आनंद पानसरे आणि भाऊसाहेब गांजवे आधारवाडी कारागृहात कैद्यांच्या बराक्यांची पाहणी करत होते.
महम्मद आणि अंकित या दोघाच्या बराकीतून बाहेर निघत असतानाच अचानक यातील एकाने जेलर पानसरे यांच्यावर पाठीमागून कसल्यातरी टोकदार वस्तूने वार केला. या हल्ल्यात जेलर पानसरे यांच्या मानेला जखम झाली. तर त्यांना वाचविण्यासाठी मधे पडलेल्या शिपाई भाऊसाहेब गंजवे यांच्यावर दुसर्या कैद्याने हल्ला केला.
आरडाओरडा होताच कारागृहातील वॉर्डन व इतर कर्मचार्यांनी झटापट करून महम्मद आणि अंकित यांच्याकडील टोकदार वस्तू ताब्यात घेतल्या. पेनाच्या झाकणाला अडकविण्यासाठी असलेल्या पत्र्याच्या हँडलला टोक काढून या कैद्यांनी शस्त्र तयार केल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले.
रविवारी 8 ऑगस्ट रोजी तर याच कारागृहातील शौचालयात मोबाईल फोन, विद्युत वायर, स्टील पिन आणि इतर वस्तू आढळून आल्या होत्या. या कारागृहातून कैद्यांचा बाहेरील जगताशी थेट संपर्क साधला जात असल्याचा अनेक घटना या कारागृहात सापडल्या जाणार्या मोबाईल सेटवरून उघडकीस आल्या आहेत. नामचीन गुंड-गुन्हेगार मंडळींचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. या जेलमधील भाई लोक चक्क मोबाईलचा सर्रास वापर करताना अनेकदा आढळून आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.