Uncategorized

अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यांविषयी उदासीनता; आज लाक्षणिक धरणे आंदोलन करणार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध करणारा कायदा अर्थात अ‍ॅट्रॉसिटीतील अ‍ॅक्ट अन्वयेच्या गुन्ह्यांसंदर्भात प्रचंड उदासीनता आहे. याविरोधात रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे,' अशी माहिती मोर्चाचे राहुल डंबाळे, उमेश चव्हाण आणि विठ्ठल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांकडून गुन्हे दाखल करून न घेणे, नकार अर्ज महिनोंमहिने प्रलंबित ठेवणे, दाखल गुन्हयातील आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करणे इत्यादी प्रकारे गुन्ह्यांतील दलित समाजाच्या तक्रारदारांची छळवणूक करून सवर्ण समाजातील आरोपींना अप्रत्यक्ष साहाय्य करण्याचे काम पोलिसांकडून होत आहे. पुणे पोलिसांकडे 2022 या वर्षात आतापर्यंत तब्बल 150 हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचे चव्हाण यांनी या वेळी सांगितले. चतुःशृंगी पोलिस ठाण्याअंतर्गत दलित समाजाच्या महिलेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून त्यानांच जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असतानाही यातील एकाही आरोपीला अद्यापर्यंत अटक करण्यात आलेली नाही.

त्यामुळे रिपब्लिकन युवा मोर्चाचे वतीने बुधवारी ( दि. 27) सकाळी 11 वाजल्यापासून औंध येथील साहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालय येथे बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा ही डंबाळे यांनी दिला

SCROLL FOR NEXT