मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. अन्य केंद्रीय मंडळाचे निकाल अद्याप जाहीर होण्याचे बाकी असल्याने अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा रखडला आहे. यामुळे पुढील वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थी पालक गोंधळात आहेत.
राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.
या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केली असून प्रवेश अर्जाचा भाग एक देखील भरला आहे. मुंबई विभागातून 1 लाख 60 हजार 856 विद्यार्थ्यांची नोंंदणी केली आहे. तर पुणे-पिंपरी-चिंचवडमधून 64 हजार 96, नागपूर 16 हजार 842, नाशिक 15 हजार 896 आणि अमरावती विभागातून 6 हजार 519 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
सीबीएसई आणि आयसीएसई मंडळांचा निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे. निकालाशिवाय या बोर्डांच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणीदेखील करता येत नाही. त्यामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश खोळंबले आहेत.
मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात अकरावीत प्रवेश घेताना मोठी चुरस होते. नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी काँटे की टक्कर होते. सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तेप्रमाणे प्रवेश द्यायचा झाल्यास या इतर सर्व मंडळाच्या निकालाची वाट पाहण्याशिवाय शिक्षण विभागाकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही.
यासाठी शिक्षण संचलनालयाकडून पुढील प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आल्याचे समजते. हा निर्णय आल्यानंतर 22 जूननंतर महाविद्यालय पसंतीक्रम भरणे, सर्वसाधरण गुणवत्ता यादी जाहीर करणे तसेच पहिल्या तीन गुणवत्ता याद्या, विशेष प्रवेशफेरी राबविण्याविषयीचा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
माहितीपुस्तिका उपलब्ध नाही…
अकरावी प्रवेशाकडे यंदा शालेय शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. प्रवेशाची माहितीपुस्तिका संकेतस्थळावर अद्याप उपलब्ध झालेली नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांकडून होत आहे. माहितीपुस्तिकेच्या आधारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे सोईचे होते. या पुस्तिकेत महाविद्यालयांची नावे, महाविद्यालय कोडची माहिती असते. महाविद्यालय पसंतीक्रम नोंदविताना या पुस्तिकेचा विद्यार्थ्यांना उपयोग होतो. मात्र प्रवेशप्रक्रिया सुरू झाली तरी अद्याप ही पुस्तिकाच नसल्याचे पालक सांगत आहेत.