Uncategorized

पिंपरी-चिंचवडमध्ये तरुण पोलिस अधिकारी फिल्डवर!

Pudhari News

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सर्वच महत्वाच्या विभागांवर तरुण अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी तरुण अधिकारी फिल्डवर उतरवल्याचे दिसून येत आहे. 

एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले चाकण विभागाचे सहायक आयुक्त राम जाधव हे बुधवारी (३०) सेवानिवृत्त झाले. त्यांनी पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील सराईत गुन्हेगारांचा खात्मा केला आहे. शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यात जाधव यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या रिक्त जागी शहरातील अशाच अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, कृष्ण प्रकाश यांनी कोल्हापूर येथून आलेल्या सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्याकडे चाकण विभागाची जबाबदारी सोपवली. 

पिंपरी विभागात नेहमी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे तेथे संयमाने परिस्थिती हाताळणारा अनुभवी अधिकारी हवा, असा निकष यापूर्वी लावला जात होता. मात्र, या ठिकाणी देखील कृष्ण प्रकाश यांनी तरुण असलेल्या सहायक आयुक्त डॉ. सागर कवडे यांची नियुक्ती केली. तसेच, यापूर्वी गुन्हे शाखेत देखील शहराची नस माहिती असलेल्या सहायक आयुक्तांची वर्णी लावली जात होती. मात्र, तेथे देखील कृष्ण प्रकाश यांनी शहरासाठी नवखे डॉ. प्रशांत अमृतकर आणि श्रीकांत डिसले यांना संधी दिली. आता गुन्हे शाखेचे विविध पथके या तरुण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. 

या व्यतिरिक्त सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्याकडे वाकड विभागाचा चार्ज आहे. येथे देखील यापूर्वी तरुण असणारे गणेश बिरादार यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, जाधव यांनी मॅटमध्ये धाव घेतल्याने त्यांना पुन्हा वाकड विभागाचा पदभार सोपवण्यात आला. संजय नाईक पाटील यांच्याकडे देहूरोड विभाग, तसेच नंदकुमार पिंजण यांच्याकडे वाहतूक विभाग- १ व प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार आहे. वाहतूक विभाग २ चा पदभार नंदकिशोर भोसले पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. एकंदरीत कृष्ण प्रकाश यांनी केलेल्या या बदल्यांवरून त्यांनी तरुण अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जास्त विश्वास टाकल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT