Uncategorized

आता घरबसल्या मिळवा लर्निंग लायसन्स!

Pudhari News

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शिकाऊ वाहन चालकांना आता घरबसल्या लर्निंग लायसन्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार नवख्या चालकांना फक्त आधार कार्डच्या आधारे घरात बसून ऑनलाईन अर्ज करून परीक्षा देता येणार आहे. याशिवाय नॉन ट्रान्सपोर्ट अर्थात खाजगी प्रवासी वाहनांच्या नोंदणीसाठी प्रादेशिक कार्यालयात (आरटीओ) वाहन घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे या दोन निर्णयांमुळे वाहन चालक व मालकांना फेसलेस सुविधा उपलब्ध होणार आहे.

परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी संबंधित दोन निर्णयांची घोषणा केली आहे. यामधील पहिल्या निर्णयात कोरोना काळात शिकाऊ परवाना म्हणजेच लर्निंग लायसन्स काढण्यासाठी चालकांना आरटीओमध्ये येण्याची गरज नाही. याआधी चालकांना लर्निंग लायसन्ससाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर स्लॉट बुक करून आरटीओमध्ये संगणकावर परीक्षा देण्यासाठी जावे लागत होते. मात्र आरटीओमधील गर्दी कमी करताना एजंट मार्फत होणारा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचे ठरेल, असे ढाकणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नव्या वाहन खरेदीत वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी मालकांना आरटीओचे खेटे घालावे लागत होते. मात्र परिवहन आयुक्तांच्या दुसर्‍या निर्णयात आधार कार्डच्या मदतीने वाहनाची नोंदणी करता येणार आहे. यामध्ये फक्त नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांना घरात बसून रजिस्ट्रेशनची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी व कार्यालयांना दिल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

नव्या दुचाकी व चारचाकी चालकांना दिलासा

मोटार सायकल व कार या नव्या वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन वाहन घेऊन आरटीओमध्ये येण्याची गरज नसल्याचे परिवहन आयुक्तांनी नव्या आदेशात म्हटले आहे. नवीन वाहनांची पहिल्यांदाच नोंदणी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षकांकडून वाहन तपासणीची गरज नाही. त्यामुळे वाहन अधिकृत विक्रेत्याने शुल्क व कर भरल्यानंतर आपोआप नोंदणी क्रमांक जारी होईल. वाहन वितरक सर्व कागदपत्रांवर डिजिटल सहीचा वापर करतील. त्यामुळे वाहन तसेच कागदपत्रे घेऊन आरटीओत जावे लागणार नाही.

काय फायदे होणार?

नव्या पद्धतीमुळे नागरिकांना आरटीओत येण्याची गरज भासणार नसल्याने तेथील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे नागरिकांचा आणि अधिकार्‍यांच्या वेळेची बचत होणार आहे. दरम्यान, ज्या चालकांकडे आधार कार्ड नाही, किंवा अद्ययावत आधार कार्ड नाही, त्यांच्यासाठी पूर्वीप्रमाणे स्लॉट बुक करून लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा देण्यात येईल. 

असे मिळणार लर्निंग लायसन्स   


आधार कार्डद्वारे परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन लर्निंग लायसन्ससाठी इच्छुकांना अर्ज करता येईल.


अर्जदाराने आधार क्रमांकाची नोंद करताच त्याचे नाव, पत्ता व स्वाक्षरी आधार डेटा बेसमधून परिवहन संकेतस्थळावर येणार आहे.


आधार कार्डमुळे अर्जदाराच्या ओळखीची व पत्त्याची वेगळी खातरजमा करण्याची गरज भासणार नाही. 


अर्ज केल्यानंतर चालकांना रस्ते सुरक्षा विषयक व्हीडियोची पाहणी केल्यानंतर लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा देता येईल.


या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अर्जदारांना 60 टक्के अचूक उत्तरे द्यावी लागतील.

उत्तीर्ण अर्जदारांना घरात बसून लायसन्सची प्रिंट आऊंट काढता येईल.

डॉक्टरांचे सर्टिफिकेटही चालकांना ऑनलाईन भरण्याची सुविधा यामध्ये देण्यात आलेली आहे.

 

SCROLL FOR NEXT