Uncategorized

‘नागरिकत्व’चा काळा कायदा मागे घ्या

Pudhari News

पुणे : प्रतिनिधी

नागरिकत्व नोंदणी, सुधारणा कायदा हा काळा कायदा आहे. तो मागे घ्यायला हवा. तीच मागणी घेऊन गांधी शांती यात्रा सुरू केली आहे. संविधानाचे रक्षण करणे, एकतेचा संदेश देणे आणि गांधीजींच्या विचारांना मरू न देणे, हा हेतू त्यामागे आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केले.

गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) ते राजघाट (दिल्ली) या मार्गावर 9 ते 30 जानेवारी अशी गांधी शांती यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा गुरुवारी पुण्यातील गांधीभवन येथे आल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत सिन्हा बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अभिनेते, नेते शत्रुघ्न सिन्हा, डॉ.कुमार सप्तर्षी, माजी आमदार आशिष देशमुख आदी उपस्थित होते. 

सिन्हा म्हणाले, भाजप हा देश तोडणार्‍यांचा, देशद्रोह्यांचा पक्ष आहे. त्यामुळेच मी हा पक्ष सोडला. 1955 च्या कायद्यानुसार, सरकार परकीय नागरिकाला या देशाचे नागरिकत्व देऊ शकते; परंतु सध्या देशात असलेली अर्थिक मंदी, बेरोजगारी यावरून लक्ष हटविण्यासाठीच हा नवा कायदा आणला गेला; परंतु या कायद्यात अनेक त्रुटी असून, तो अस्तित्वात येणार नाही. सरकार याला धार्मिक रंग देऊ पहात आहे. विद्यापीठात होत असलेली हिंसा सरकारपुरस्कृत असल्याचा आरोप करून सिन्हा यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली.  

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशात प्रक्षोभक वातावरण आहे. पुनर्विभाजन करण्याचे सरकारचे कारस्थान आहे. त्यामुळे संविधान धोक्यात आले आहे. देशाला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. याविरुद्ध तरूण एकत्र येत आहेत. गांधीजीचे विचार मारण्याचे काम सरकार करत आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीए रद्द करेपर्यंत ही यात्रा सुरूच राहणार आहे. विद्यापीठांमंध्ये राजाश्रय असल्याशिवाय हल्ले होऊ शकत नाहीत, असा आरोप चव्हाण यांनी केला. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून जेएनयू हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.  

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, देशातील युवाशक्तीमध्ये आक्रोश आहे. काही लोकांच्या गर्वामुळे देशात अस्वस्थता निर्माण झाली आहे. एनआरसीमुळे लोकांमधे भीती निर्माण झाली आहे. मोदींनी विश्वसनीयता गमविली, मोदींच्या भाषणात कंटेंट नाहीत. पुन्हा पुन्हा तीच भाषणे. नोटबंदी, अर्थिक मंदी,  बेरोजगारी,  शेतकरी मालाला हमीभाव आदी प्रश्न सोडविण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. एनआरसी नाही म्हणायचे आणि दुसरीकडे मुद्दा पुढे चालवत रहायचे, असे दुटप्पी धोरण सुरू आहे. पंतप्रधान म्हणतात, एनआरसीची चर्चा नाही, तर दुसरीकडे ते राबवणार असल्याचे शहा सांगतात. डिटेंन्शन सेंटर नसल्याचे सांगतात, तर दुसरीकडे कॅम्पमध्ये लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.  

डॉ. सप्तर्षी म्हणाले, 'जेव्हा पक्ष कमी पडतात तेव्हा जनता रस्त्यावर उतरून लोकशाही व्यवस्था संरक्षणासाठी चळवळ करते, असे जयप्रकाश नारायण यांनी सांगीतले होते. पुण्यातील आताच्या आंदोलनात युक्रांद हा समान धागा आहे. पुण्यावर कोणी मालकी सांगू नये. येथील सामाजिक सर्वसमावेशक वातावरण आम्ही जिवंत ठेवू. हिटलरच्या मार्गाने जाणार्‍यांसाठी आत्महत्या हा शेवटचा मुक्काम असतो. हे सरकार सध्या त्याच मार्गावर मार्गक्रमण करत आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT