शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : बसचालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात कोंढापुरी येथे दोघांचा मृत्यू झाला. तर सहा दुचाकी, टपऱ्या व मंदिराचे नुकसान झाले. ही घटना रविवारी (दि. २७) सकाळी साडेदहाच्या सुमारास कोंढापुरी (ता. शिरूर) येथे घडली.
अधिक वाचा : आगीतून फुफाट्यात! घरगुती गॅसच्या किंमती ६० टक्क्यांपर्यंत वाढणार
ही बस घेऊन चालक अशोक सुदाम मते (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) हा शिक्रापूरहुन रांजणगाव येथे असलेल्या जेबील कंपनी येथे कामगार घेऊन निघाला होता. त्याचा बसवरील ताबा सुटल्याने कोंढापुरी येथे हा अपघात झाला. यामध्ये शामराव दगडू लोखंडे (रा. कोंढापुरी, ता. शिरूर) व रामचंद्र बुवाजी वाघमोडे या दोघांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. रस्त्याच्या कडेला असलेल्या सहा दुचाकींना बसने ठोकरले. तर दोन टपऱ्या व एका मंदिराचे या अपघातात नुकसान झाले आहे.