सातारा : प्रतिनिधी
थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणीच्या टेबल लॅन्डवर देशभरातून आलेल्या हजारो पर्यटकांनी विविध रंगीबेरंगी आज पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. सध्या पाचगणीत 'आय लव्ह पाचगणी' फेस्टीव्हल सुरु असून, या फेस्टीव्हलला पर्यटक गर्दी करीत आहेत.
पाचगणीच्या टेबल लॅन्डचा उल्लेख हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार असा होतो. समुद्र सपाटीपासून ४ हजार २६७ फुट उंचीवर असलेले पाचगणी पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे. याच शहरात सध्या 'आय लव्ह पाचगणी' महोत्सवाच्या माध्यमातून आज आणि उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दुसऱ्या दिवशी टेबल लॅन्डवर पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टेबललॅन्डच्या पठारावर बेंगलोर, सुरत, अहमदाबाद येथुन आलेल्या पर्यटकांनी मनसोक्त पतंग उडविण्याचा आनंद लुटला.
महाबळेश्वर- पाचगणी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना टेबललॅन्डवर सध्या पतंगाच्या कार्टुनमधील अनेक प्रतिकृतीत, ड्रॅगन, श्री गणेशा, रॅबीट, शार्क, मारिओ अशा विविध आकाराचे रंगबिरंगी पतंग सध्या पर्यटकांना आकर्षित करताना पहायला मिळत आहेत. इतर कार्यक्रमांबरोबर सलग दोन दिवस या पतंग महोत्सवाचा आनंद या टेबल लॅन्डवर पर्यटकांना घेता येणार आहे.