कोल्हापूर : प्रवीण मस्के
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणार्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करूनही दरवर्षी जिल्ह्यात सुमारे 1500 जणांना कॅन्सर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात 30 ते 50 वयोगटातील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. प्राथमिक टप्प्यावर उपाययोजना केल्यास कॅन्सरवर मात करता येते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
31 मे हा जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. घर, कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे व धूम—पान करणार्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. सार्वजनिक ठिकाणी धूम—पान बंदी, 18 वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, आदींचा यात समावेश आहे. शासकीय कार्यालय व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी आहे. अशा लोकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालूनही याची पायमल्ली होताना दिसते.
तोंडात बरी न होणारी जखम, गिळताना त्रास होणे, अपचन, धाप लागणे ही तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारी लक्षणे आहेत. इतर कॅन्सरपेक्षा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणार्या कॅन्सरचे प्रमाण 60 टक्के आहे. लहान वयात कॅन्सरचा प्रभाव जास्त असतो व लवकर बरे होणे अवघड असते. कॅन्सरचे निदान उशिरा होते, प्राथमिक उपचार होत नसून अॅडव्हान्स स्टेजला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी आहे. व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदतीच्या माध्यमातून कॅन्सर रोखता येणे शक्य असते.
कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी करणार्यांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते. बाहेरील संसर्ग होण्याची शक्यता असते. कोरोना काळात अशा रुग्णांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचार करून त्यांच्यावर पुन्हा कॅन्सरचे औषधोपचार केले जातात, असे डॉक्टरांनी सांगितले.
तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन, दारूचे सेवन यामुळे कॅन्सर होण्याचा धोका चारपट जास्त असतो. सामाजिकदृष्ट्या तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. लहान वयात सुरू झालेले व्यसन दडपले जाते, त्यामुळे आजार बळावतो. यासाठी प्रतिबंधात्मक उपचारांबरोबरच शाळा, महाविद्यालयस्तरावर जनजागृती
महत्त्वाची आहे.
– डॉ. सूरज पवार, चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, कोल्हापूर कॅन्सर सेंटर