Uncategorized

गुन्हेगारांना मोकळे रान

अंजली राऊत

नाशिक : एक शून्य शून्य – गौरव अहिरे

शहरातील बाजारपेठेत वर्चस्ववादातून होणारी दगडफेक, प्राणघातक हल्ला, गोळीबार, खून, वाहनांची तोडफोड, अवैध धंदे, चोरी, घरफोडी, जबरी चोरीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड केली जात असली तरी गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे बोलले जात आहे. पोलिस दलात खांदेपालट झाल्यानंतर गुन्हेगारांवर वचक राहील असे वाटत असतानाच गुन्हेगारांकडून सर्रास गुन्हे होत असल्याने अप्रत्यक्षरीत्या पोलिसांनाच आवाहन मिळत आहे.

नुकताच पंचवटीत आढळलेला बेवारस मृतदेह, देवळाली गावात दोन गटांत झालेल्या वादातून एकाने हवेत केलेला गोळीबार, दहीपूल परिसरात दोन गटांनी वर्चस्व वादातून केलेली तुफान दगडफेक व एकावर केलेला प्राणघातक हल्ला, सातपूर येथे एकाने नशेत वाहनांच्या काचा फोडल्या, सोशल मीडियावरील वादातून सातपूरला एकाचा झालेला खून, 'माझ्याकडे काय पाहतो' अशी कुरापत काढून नाशिकरोडला एकावर झालेला प्राणघातक हल्ला याचसोबत नित्याने होणार्‍या चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे प्रकार पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवले जात आहेत. या गुन्ह्यांमधील संशयितांना पोलिसांनी पकडले किंवा त्यांचा शोध सुरू असला तरी या गुन्ह्यांनी सर्वसामान्य नागरिकांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या झळ पोहोचत आहे. दहीपूल येथील घटनेत स्थानिक व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागले. तुफान दगडफेक, एकावर प्राणघातक हल्ला करूनही दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार न देण्याचा समझोता केल्याने तो चर्चेचा विषय बनला होता. अखेर पोलिसांनी सुमोटो कारवाई करीत दोन्ही गटांतील गुंडांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यामुळे बाजारपेठेत सर्वांसमक्ष एकमेकांवर प्राणघातक हल्ले करून दगडफेक करणार्‍यांमध्ये आपापसात वाद मिटवण्याचा प्रकार होत असल्याने पोलिसांचा धाक नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. त्याचप्रमाणे सातपूर येथे वाहनांची तोडफोड करणार्‍यानेही दारूच्या नशेत तोडफोड केल्याचे समोर आले असले तरी त्यास कायद्याचा धाक नसल्याने त्याने ही तोडफोड केल्याचा आरोप होत आहे. तर सातपूरमधील मित्राचा खून, देवळाली गावात माजी लोकप्रतिनिधीच्या मुलाने हवेत केलेला गोळीबार, नाशिकरोडला किरकोळ कारणावरून एकावर केलेला प्राणघातक हल्ला हे प्रकारही पोलिसांचा धाक नसल्याचे प्रतीक असल्याचे बोलले जाते. चोरी, घरफोडी, जबरी चोरी करणार्‍या सराईतांनाही पकडले गेल्यानंतर कायद्याचा धाक नसल्याचे दिसते. 'काही होत नाही' या अविर्भावात गुन्हेगार गुन्हे करत असतात. गुन्हेगारांवर गुन्हे दाखल होऊनही ठोस प्रतिबंध किंवा शिक्षा होत नसल्याने त्यांची गुन्हेगारी वृत्ती कमी होत नसल्याचे दिसते. शहरात प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा वावर जास्तीत जास्त दिसावा यासाठी प्रयत्न केले जातात.त्यासाठी प्रयत्नही केले जातात. मात्र, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षाच होत नसल्याने त्यांच्यावर पोलिसांचा धाक नसल्याचे चित्र आहे. परदेशात पोलिसांचा वावर सर्वत्र दिसत नाही. मात्र, त्यांचे गुन्हेगारांना अप्रत्यक्षरीत्या आवाहन असते की 'करके देखो'. कारण गुन्हा झालाच तर तातडीने गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्यासाठी कमी कालावधी घेतला जातो. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये वचक राहतो. हे चित्र आपल्याकडे दिसण्यासाठी पोलिसांना ठोस कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

SCROLL FOR NEXT