Uncategorized

भंडारा : तीन वाघाचे बछडे, एका अस्वलाचा मृत्यू

Pudhari News

भंडारा : पुढारी वृत्तसेवा

बुधवारचा दिवस जिल्ह्यातील वन्यप्राण्यांसाठी काळा दिवस ठरला. भंडारा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाºया गराडा बु. येथे सकाळी वाघाचे दोन बछडे सायफन विहिरीत मृतावस्थेत आढळले. त्यानंतर दुपारी रावणवाडी जंगलात अस्वलाचा मृतदेह सापडला. तर पवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत गुडेगाव बिटात वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला. तीन वाघाचे बछडे आणि एका अस्वलाच्या मृत्युने जिल्ह्यातील वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनांमुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत गराडा बु. गावाजवळील टेकेपार उपसा सिंचन योजनेच्या सायफन विहिरीत वाघाच्या दोन बछड्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी व्यायाम करणाºया तरुणांच्या लक्षात आली. त्यांनी वन विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील बछड्यांना बाहेर काढल्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. याठिकाणी एका वाघिणीच्या पायाचे ठसे सुद्धा आढळून आले. त्यामुळे ती वाघिण परिसरातच असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ही बछडे दीड ते दोन महिन्यांचे नर होते. सायफन विहिर कोरडी असल्याने त्याठिकाणी वाघिणीने बछड्यांना जन्म दिला. परंतु, जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने सायफन विहिरीत पाणी जमा झाले होते. या पाण्यात बुडून बछड्यांचा मृत्यू झाला. उपवनसंरक्षक भलावी व अन्य अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

वाघाच्या बछड्यांच्या मृत्यूची बातमी ताजी असतानाच दुपारच्या सुमारास रावणवाडी जंगल परिसरात एक अस्वल मृतावस्थेत आढळून आला. या अस्वलाचा मृत्यू विषारी साप चावल्यामुळे झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाºयांनी वर्तविला आहे.

पवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत गुडेगाव बिटातही वाघाच्या एका बछड्याचा मृत्यू झाला. या क्षेत्रात एका वाघिणीला दोन बछडे होते. त्यातील एका बछड्याला ती आपल्या सोबत घेऊन गेली. तर दुसरा बछडा त्याच ठिकाणी होता. वन विभागाला या घटनेची माहिती होताच त्या बछड्याची देखभाल करुन त्याचठिकाणी त्याला सोडण्यात आले. वाघिण परत येईल व त्याला घेऊन जाईल, असा अंदाज होता. परंतु, वाघिण आलीच नाही. बुधवारी सकाळी त्या बछड्याचा मृत्यू झाला.

वन्यप्राण्यांवर सामूहिक अंत्यसंस्कार

गराडा बु. येथे मृत पावलेले वाघाचे दोन बछडे आणि रावणवाडी जंगल परिसरात मृतावस्थेत सापडलेला अस्वल या तिघांवरही पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी स्पॉट शवविच्छेदन केले. त्यानंतर दवडीपार येथील नर्सरीत या वन्यप्राण्यांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेलाजवळ आढळले वाघाच्या पायाचे ठसे

भंडार शहराला लागून असलेल्या बेला-कोरंबी मार्गावरुन जाणाºया जवाहरनगर रेल्वे मार्गावर मंगळवारी सकाळी वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. या ठशावरुन हा वाघ रेल्वेलाईनवरुन चालत दवडीपार (बेला)कडे गेला असल्याचे दिसून आले. वन विभागाने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ज्याठिकाणी वाघाचे ठसे आढळले तो भाग जंगलाला लागून नाही. कोका वन्यजीव अभयारण्य येथून १५ ते २० किमी लांब आहे. तर १५ किमी लांब आयुध निर्माणी आहे. कोका वन्यजीव अभयारण्य ते उमरेड-पवनी-कºहांडला वन्यजीव अभयारण्यला जोडणारा हा कॉरिडोर होऊ शकतो. यादृष्टीने या क्षेत्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT