Uncategorized

नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाईन?

Pudhari News

कोल्हापूर : प्रवीण मस्के

मागील दीड वर्षापासून ऑनलाईन शिक्षणाला सामोरे जाणार्‍या विद्यार्थी, शिक्षकांची कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुटका होण्याची शक्यता वाटत नाही. शाळांनी ऑनलाईन, ऑफलाईनची तयारी ठेवली असून, शासन निर्देशाच्या प्रतीक्षेत शाळा आहेत. 

पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आले आहेत. कोरोनाची परिस्थिती अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त केली असून, लहान मुलांना संसर्गाचा धोका असल्याचे सांगितले आहे. शिक्षण विभागाने 14 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची तयारी केली आहे. तसे परिपत्रक गटशिक्षण अधिकार्‍यांना पाठविले आहे. 

जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या सुमारे 1,976 प्राथमिक शाळा असून, 1 लाख 65 हजार विद्यार्थी आहेत. शासन निर्देश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार शाळा भरविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सांगितले. शहरात महापालिकेच्या 58 शाळा व 10 हजार 600 विद्यार्थी आहेत. खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सर्व मिळून 298 शाळांमध्ये 1 लाख 70 हजार विद्यार्थी आहेत. शाळा ऑनलाईन की ऑफलाईन सुरू कराव्यात, याबाबत शिक्षण विभागाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे मनपा प्राथमिक शिक्षण समितीचे प्रभारी प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी सांगितले.  

सद्यस्थितीत ऑनलाईन, ऑफलाईन प्रवेश सुरू आहेत. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रक काही शाळांमध्ये तयार केले जात आहे. शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा या आठवड्यात सुरू होणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू झाल्याचे शिक्षक, मुख्याध्यापकांनी सांगितले. 

SCROLL FOR NEXT