Uncategorized

क्षय रुग्णांची संख्या पावणेतीन हजारांवर

Pudhari News

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील क्षयरूग्णांची संख्या चिंताजनक आहे. जिल्ह्यातील  ऑक्टोबर अखेर 2 हजार 737  रूग्ण या आजाराच्या विळख्यात आहेत. मात्र रूग्णांची ही आकडेवारी केवळ काही खासगी  रूग्णालय व सरकारी रूग्णालयातीलच आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी रूग्णालयातील रूग्णांची माहिती उपलब्ध झाल्यास हा आकडा आणखी फुगण्याची शक्यता आहे. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या रोगजंतुमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. शरीराच्या कोणत्याही अवयवाला क्षयरोग  होवू शकतो. ह्या जंतुमूळे फुफ्फुसाला बाधा झाल्यास त्याला फुफ्फुसाचा क्षयरोग म्हणतात. 

फुफ्फुसाचा क्षयरोग हा सर्वात जास्त आढळणारा क्षयरोग आहे. फुफ्फुसाव्यतिरिक्‍त इतर कोणत्याही हाडे, सांधे, मज्जातंतुलाही क्षयरोग होवू शकतो. क्षयरोगाचे जंतु मुख्यत: हवेतून पसरतात. फुफ्फुसाचा क्षयरोग झालेला रूग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा क्षयरोगाचे हे जंतु हवेत पसरतात. ज्यावेळी जवळचा निरोगी मनुष्य श्वास घेतो तेव्हा ते जंतू त्याच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी मनुष्याला क्षयजंतुचा संसर्ग होवू शकतो. जिल्ह्यात वर्षाला 6 हजाराहून अधिक लोकांना क्षयरोग होत असून 300 हुन अधिक रूग्ण क्षयरोगाने मरण पावत असल्याची धक्‍कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. 

फुफ्फुसाचा क्षयरोग व फुफ्फुसाव्यतिरिक्‍त क्षयरोग, साधा क्षय, एमडीआर क्षय, एक्स डी आर क्षय असे क्षयरोगाचे प्रकार आहेत. सातारा जिल्ह्यात प्रत्यक्ष रोग निदान अभियानाअंतर्गत सर्व्हेक्षण करण्यात आले . जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 26 लाख 4 हजार 587 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 10 हजार 937 संशयीत रूग्ण आढळून आले. 3 हजार 469 संशयीत रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी 3 हजार 379 नमुन्यांची  मायक्रो स्कोपी तर 3 हजार 356 जणांची एक्सरे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 153 जणांना क्षयरोग झाल्याचे प्रत्यक्ष आढळून आल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. जिल्ह्यातील 12 क्षयरोग पथकामार्फत ऑक्टोबर अखेर रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सातारा 732, महाबळेश्वर 150, फलटण 190, कराड 370, पाटण 271, वडुज खटाव 173, उब—ंज 193, कोरेगाव 176, वाई 212, माण 119, खंडाळा 137, जावली 64 असे मिळून जिल्ह्यात 2 हजार 787 रूग्णांना क्षयरोग झाल्याचे आढळून आले आहे. 

सन 2014 मध्ये 2 हजार 820 क्षयरोग रूग्णांची संख्या होती  मात्र सन 2015 मध्ये ही रूग्ण संख्या कमी होवून 2 हजार 606 एवढी झाली. सन 2016 मध्ये या संख्येत क्षयरोग 

निर्मुलनाला चांगला प्रतिसाद 

मिळाल्याने ही संख्या 2 हजार 253 वर आली. सन 2017 मध्ये 2 हजार 232 तर सन 2018 मध्ये या रूग्णसंख्येत वाढ झाल्याने  2 हजार 354 रूग्ण आढळले. तर ऑक्टोबर 2019 मध्ये 2 हजार 787 रूग्ण आढळले. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजोग कदम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ए.व्ही.जाधव, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. पृथ्वीराज भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. क्रांती दयाळ, जिल्हा पर्यवेक्षक महेश पिसाळ  यांच्यासह आरोग्य कर्मचारी क्षयरोगाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

क्षयरोगाची लक्षणे…

कमी होणारे वजन, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप, रात्री येणारा घाम, भूक न लागणे, मानेला गाठी येणे, छातीत दुखणे, 21 दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा खोकला.

अशी घ्या काळजी…

खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे. खूप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक घालून त्यातच थुंकावे. इतरत्र कुठेही न थंकणे महत्वाचे. रूग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी. लहान मुलांचा व रूग्णांचा संपर्क टाळणे, घरात इतरांनीही टीबीची  काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते. नियमीत व्यायाम, धुम—पान टाळणे अशी काही पथ्थे पाळल्यास प्रतिकारशक्‍ती उत्तम राहू शकते.  तसेच स्वच्छता बाळगणे जरूरीचे असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT