Uncategorized

सातारा : ‘सगळेच समाज अस्वस्थ झाले असताना हे सरकार फक्त लुटायचे धंदे करत आहे’

Pudhari News

खटाव; पुढारी वृत्तसेवा : सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने अगोदर मराठा आरक्षणाविषयी आणि आता ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाविषयी न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नाही. सगळे समाज अस्वस्थ झाले असताना हे सरकार फक्त लुटायचे धंदे करत आहे. मराठा समाजाचे तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळाल्याशिवाय आम्ही या सरकारला झोपू देणार नाही. जिथे अपयश येईल तिथे केंद्राकडे बोट दाखविण्याचे बेशरमपणाचे काम करणाऱ्या ठाकरे  सरकारला जनतेतून उठाव होवून घरी बसावे लागेल असा टोला आ. जयकुमार गोरे यांनी लगावला. 

अधिक वाचा : कराडमधील तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रद्द झालेले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा देण्यात यावे या मागणीसाठी आज दहीवडी येथील फलटण चौकात आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली माण तालुका भाजप पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनात भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, जि. प. सदस्य अरुण गोरे, नगराध्यक्ष धनाजी जाधव, सिध्दार्थ गुंडगे, राजाराम बोराटे, लिंगराज साखरे, बाळासाहेब मासाळ, बाळासाहेब खाडे, काकासाहेब शिंदे, ॲड. दत्तात्रेय हांगे, हरीभाऊ जगदाळे, दिगंबर राजगे, नवनाथ शिंगाडे, प्रताप भोसले, शिवाजी जगदाळे, महेश कदम, अब्दागिरे, आप्पासाहेब पुकळे, रवी काटकर, अजित दडस, सदाशिव सावंत आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

अधिक वाचा : कोरोना चाचण्या, लसीकरण वाढवा

यावेळी बोलताना आ. गोरे म्हणाले, राज्यसरकारने सर्वोच्च न्यायालयात १५ महिने एम्पेरिकल डाटा सादर न केल्यामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. सर्वोच्च न्यायालयानेच या सरकारच्या वेळकाढू धोरणाला फटकारले आहे. या सरकारची मराठा आणि ओबीसी समाजाप्रती संवेदना संपली आहे. सरकारमधील छगन भुजबळांसारखे ओबीसी मंत्री आता आंदोलन करायची नौटंकी करत आहेत. हिम्मत असेल तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देवून ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करावे. या  सरकारने दडपशाही आणि लुटालूट सुरु ठेवली आहे. अजित पवारांच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला हजारोंचा समुदाय चालतो मात्र आपल्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या मराठा आणि ओबीसी समाजाची  दडपशाहीने मुस्कटदाबी केली जात आहे. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आणि मराठा समाजाचे आरक्षण मिळत नाही, मागासवर्गीय आयोग स्थापन होत नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही झोपू देणार नाही आणि मंत्र्यांना फिरु देणार नाही असा इशाराही आ. गोरे यांनी दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालविणाऱ्या राज्यसरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच धनगर समाजबांधवांनी ढोल, लेझीमच्या तालावर गजी नृत्य करुन आंदोलनात सहभाग नोंदवला. 

अधिक वाचा : 'कराड पालिकेत साडेचार वर्षे नुसाता तमाशा झाला'

पोलीसांच अभूतपूर्व बंदोबस्त….!

भाजपच्या आजच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दहीवडी आणि परिसरात पोलीसांनी अभूतपूर्व बंदोबस्त ठेवला होता. सर्वच भाजप पदाधिकाऱ्यांना आदल्या दिवशीच फौजदारी प्रक्रिया संहिता १४९ नुसार नोटीस देण्यात आल्या होत्या. म्हसवड, गोंदवले, मार्डी, पिंगळी फाटा, बिदालसह सर्वच बाजूंनी येणाऱ्या रस्त्यावर बॅरिगेट्स लावून आंदोलनकर्त्यांना अडविण्यात येत होते. एकाही वाहनाला दहीवडी शहरात प्रवेश दिला जात नव्हता. आंदोलनकर्ते दोन किमी पायी चालत चौकात पोहचले. चक्काजाम  आंदोलन तासभर चालल्यामुळे फलटण चौकात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT