Uncategorized

आजरा तालुक्यात 100 एकरांवर दरवळणार घनसाळचा सुगंध

Pudhari News

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत ; चालू खरीप हंगामामध्ये आजरा तालुक्यात 100 एकर क्षेत्रावर घनसाळ लागवडीचे उद्दिष्ट ठेवून तालुका कृषी विभागामार्फत सेंद्रीय पद्धतीने हे उत्पादन घेण्याबाबत प्रयत्न सुरू झाले आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) देखील हे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी हातभार लावत आहे. यामुळे यावर्षी तब्बल 100 एकर क्षेत्रावर घनसाळचा सुगंध दरवळणार असल्याचे दिसू लागले आहे. 

आजरा तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या घनसाळ तांदळाला भौगोलिक उपदर्शन मानांकन (जीआय) मिळाल्यानंतर या तांदळाची मागणी प्रचंड वाढली आहे. केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून ही मागणी होत आहे. तालुक्याच्या ठराविक भागातच पिकणारा हा तांदूळ मागणीइतका उत्पादित होत नसल्याने बहुतांशी व्यापारीवर्गाकडून घनसाळसदृश तांदळाची भेसळ करून हा तांदूळ बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवला जात असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. उत्पादनवाढीसाठी उत्पादकांकडून रासायनिक खतांचा वापरही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. 

मागणीच्या तुलनेत पुरवठा होण्यासाठी तालुका कृषी विभाग व 'आत्मा'मार्फत घनसाळ क्षेत्र विस्तार प्रात्यक्षिक कार्यक्रम प्रमुख घनसाळ उत्पादक गावांमध्ये राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः तालुक्यातील दाभिल या गावामध्ये उत्पादित होणारा घनसाळ तांदूळ दर्जेदार असल्याने या गावामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र घनसाळ लागवडीखाली आणण्याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. 'एक गाव-एक वाण' या उपक्रमांतर्गत एका दाभिल या गावामध्ये 50 एकर क्षेत्रात घनसाळ लागवड करण्यात येणार आहे.

जीआय मानांकन मिळाल्यानंतर तालुक्यातील 32 गावांमधील शेतकर्‍यांनी घनसाळ उत्पादक म्हणून नोंदणी केली आहे. यामध्ये भाग घेणार्‍या उत्पादक शेतकर्‍यांची अधिकृत घनसाळ उत्पादक व विक्रेता अशी नोंद केली जाणार आहे. शासनाने अलिकडेच रासायनिक खतांची 10 टक्के बचत करण्याची भुमिका जाहीर केली आहे. घनसाळबरोबरच काळा जिरगा हे वाणही सेंद्रीय पध्दतीने कसे पिकवले जाईल यावर विशेष भर देण्यात येत आहे. याकरिता कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व मंडल कृषी अधिकारी यांनी पुढाकार घेतला आहे. 

कृषी विभागाचे एकंदर धोरण पाहता येत्या काही वर्षामध्ये तालुक्यातील घनसाळ उत्पादक शेतकर्‍यांकडून सेंद्रीय पध्दतीने जास्तीत जास्त उत्पादन वाढीवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. घनसाळ तांदळाला मिळणार्‍या घसघसीत दरामुळे तालुक्यातील घनसाळ उत्पादक शेतकर्‍यांमध्येही उत्पादन वाढीची स्पर्धा अप्रत्यक्षरित्या सुरु झाल्याचे दिसत आहे. 

भेसळीवर नियंत्रण आवश्यक

घनसाळ तांदळाची वाढलेली मागणी, मिळणारा चांगला दर यामुळे या तांदळाला भेसळीचे ग्रहण लागले आहे. ग्राहकांना दर्जेदार तांदूळ मिळाल्यास या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यासाठी इतर वाणांची भेसळ करून तांदूळ विक्री करणार्‍या मंडळींवर कडक कारवाईची गरज अधोरेखित होत आहे. 


 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT