राशीन : पुढारी वृत्तसेवा : महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांचा अपमान करणार्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ राशीन येथील महात्मा फुले चौकात सर्व पक्ष व विविध संघटनांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा, त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
केंद्रात व राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मनुवादी व धर्मांध सरकार आहे.
त्या सरकारमध्ये मंत्र्यांकडून महापुरुषांच्या बदनामीचे कटकारस्थान जाणीवपूर्वक वेळोवेळी केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा काढल्याचे वक्तव्य केले. आंदोलनात महात्मा फुले संघटनेचे अध्यक्ष कुंडलिक सायकर, रिपब्लिकन पार्टीचे अतुल साळवे, शिवा संघटनेचे नितीन शेटे, भीमराव साळवे, मातंग एकता आंदोलनचे संतोष ढावरे, युवक क्रांती दलाचे दादा राऊत, सावता परिषदेचे बापूराव धोंडे, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर सायकर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.