Uncategorized

विशेष संपादकीय : जनतेने साथ द्यावी

Pudhari News

कोरोना विषाणू साथ उच्चांकावर असताना देशभरातील लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढवण्याचा निर्णय हा आपणा सर्वांचीच अधिक परीक्षा घेणारा आहे. या लॉकडाऊन-3 मध्ये तुलनेने अनेक गोष्टी सुरू होतील आणि बंद गोष्टी कमी असतील. लॉकडाऊनच्या गेल्या दोन टप्प्यांत कुलूपबंद झालेले देशाचे अर्थचक्र पुन्हा मार्गस्थ करण्याचा धाडसी प्रयत्न जसा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केला, तसाच तो महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार देखील करत आहे. याआधी फक्‍त जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी होती. या लॉकडाऊनमध्ये मात्र काही अटी-शर्ती घालून का होईना, इतरही वस्तूंची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे ग्रीन, ऑरेंज आणि रेड या तीन झोनच्या पलीकडे आणखी दोन झोन निर्माण झाले. यातील कन्टेन्मेंट झोनमध्येच एकूणएक व्यवहार बंद ठेवण्याचा पर्याय स्वीकारत अन्य सर्व झोनमध्ये एक ना अनेक सवलती देत व्यवहार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न दिसतो. हे व्यवहार सुरू करताना घातलेल्या अटी तशा फार सरळ, स्पष्ट आणि एव्हाना आपल्याला सवयीच्या झालेल्या असल्या पाहिजेत. म्हणजे कोणत्याही दुकानासमोर गर्दी नको, दोन ग्राहकांच्या मध्ये किमान तीन फुटांचे अंतर असले पाहिजे, प्रत्येकाने मास्क लावलाच पाहिजे, ज्येष्ठांनी आणि लहानांनी अजिबात घराबाहेर पडू नये. हे सारे नियम याआधीच्या दोन्ही लॉकडाऊनमध्ये होते. या तिसर्‍या लॉकडाऊनमध्येदेखील ते काटेकोरपणे पाळायचे आहेत. मात्र देश कोरोनाशी निकराची लढाई लढत असताना हे नियम कसे  पायदळी तुडवता येतील, याचाच विचार करणारे महाभाग आपल्याकडे कमी नाहीत. सोमवारपासून लॉकडाऊन-3 सुरू झाला आणि हळूहळू दुकाने उघडू लागताच अनेक बाजारपेठांमध्ये मास्क न लावताच वर तोंड करून फिरणार्‍यांची गर्दी उसळली. शारीरिक अंतराचे भानही अनेकांना नव्हते. म्हणायला दारूसाठी किंवा धान्यासाठी कडक शिस्तीत रांगा लावून उभे, पण दोघांमध्ये आवश्यक असलेल्या अंतराचा पत्ता नाही. यातून कोरोनाची साथ आणखी पसरू शकते, हे कोण लक्षात घेणार? भारताने सर्वात अगोदर लॉकडाऊन करून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जी निर्णायक आघाडी घेतली त्यावर तुम्हाला पाणी सोडायचे आहे का? लॉकडाऊन लागू करणे जितके सोपे तितके लॉकडाऊन उठवणे अवघड असते, असे तज्ज्ञ सांगत होते ते खरे ठरले. किंबहुना हा अंशतः लॉकडाऊन-3 हा पहिल्या आणि दुसर्‍या लॉकडाऊनपेक्षा जास्त जिकिरीचा आहे. अनेक दिवस पिंजर्‍यात कोंडलेली जनावरे मोकळी सोडली की ती सुसाट सुटतात. तसेच माणसांचेही झाले. सलग दोन लॉकडाऊनमध्ये कोंडलेली माणसे बाजार सुरू होतोय म्हणताच भान विसरून सुसाट सुटू लागली आहेत. त्यांना आवरायचे म्हणजे मास्क लागेल आणि कायद्याच्या मुसक्यादेखील लागतील. अन्यथा कोरोनाच्या लढाईतही अशा मूठभर बेशिस्त माणसांमुळे अर्थचक्र पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसेल. कोरोनाची रुग्णसंख्या देशात चाळीस हजारांवर पोहोचली आहे. त्यातील सरासरी चाळीस टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. मुंबई, पुण्यात तर कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा परिस्थितीतही सरकारने स्वत:हून बाजारपेठ सुरू करण्याचे धाडसी पाऊल टाकले. या कामी शिस्त पाळून सरकारला साथ देण्याऐवजी भर बाजारात बेशिस्तीचे प्रदर्शन करणे म्हणजे सरकारच्या पायात पाय घालण्यासारखे आहे. या देशाचे कोरोनाने एक आजार म्हणून केलेले नुकसान कमी आहे. परंतु सलग दोन लॉकडाऊनने केलेले नुकसान हे प्रचंड आहे. या दोन्ही लॉकडाऊनमध्ये उद्योगधंदे बंद पडले, हजारोंच्या नोकर्‍या गेल्या, ज्यांच्या टिकल्या त्यांच्यावर पगारकपातीची आफत ओढवली, रोज लक्ष्मीचा वावर असलेल्या बाजारपेठा एकाएकी ओस पडल्या. हा परिणाम कोरोनाचा नाही. लॉकडाऊनचा आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे आता हा कोरोना विषाणू कुठेही जाणार नाही. तो आपल्या सोबतच राहणार आहे. त्याच्या सोबतीची, त्याच्या सततच्या असण्याची सवय आपल्याला करून घ्यावी लागेल. जाता-येता सर्दीपडसे होते, ताप भरतो, खोकला येतो आणि व्हायरल इन्फेक्शन झाले म्हणून आपण एक तर सरळ मेडिकलमधून औषध घेतो किंवा गल्‍लीतला डॉक्टर गाठतो. असेच आपल्याला कोरोनाच्या बाबतही उद्या करावे लागेल. फार तर कोरोनाची बाधा जरा जिकिरीची म्हणून त्यावरचे इलाजही वेगळे असतील. पण ही साथ आता संपली आहे आणि कुणालाही कोरोना होणार नाही, अशी सरकारी घोषणा या देशातच काय, जगातही कुठे होणार नाही. कारण कोरोना कायमस्वरूपी आपल्याकडे मुक्‍कामी आला आहे. स्वत:ची काळजी घेणे, स्वच्छतेची शिस्त पाळणे हाच त्यावरचा कायम उपाय असणार आहे. लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नव्हे. उलट लॉकडाऊन हा कोरोनाच्या आजारापेक्षाही भयंकर इलाज ठरेल. तो वारंवार करून चालणार नाही. लॉकडाऊन एकदा नव्हे, दोनदा लागू करावा लागला आणि तिसर्‍यांदा सवलती देऊन वाढवावा लागला याचे कारण आपल्यात कायमस्वरूपी येऊन बसलेली बेशिस्त आणि अस्वच्छता. आला कोरोना की करा लॉकडाऊन हे दुष्टचक्र आपण आपल्या बेशिस्तीतून निर्माण करणार असू तर जगातला कोणताही इलाज आपल्याला वाचवणार नाही. मग एक वेळ जगातून कोरोना नष्ट होईल. मात्र, आपल्या दारिद्य्रावर कुणाकडेच इलाज नसेल. तेव्हा न मागता लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या सवलतींची किंमत ठेवा. कॅलिफोर्नियात लॉकडाऊन उठवण्याची मागणी लोक हत्यारे घेऊन रस्त्यावर उतरले आणि हे आंदोलन भडकल्यानंतर लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणण्याचे आश्‍वासन आता तिथल्या गव्हर्नरांनी म्हणे दिले आहे. बर्लिन, लेबनॉनमध्येही लोक असेच लॉकडाऊनविरोधात रस्त्यावर उतरले. असे भारतात कुठेही घडले नाही. नाही म्हटले तरी सरकारने लॉकडाऊन म्हणताच बहुतांश लोक घरात बसले. त्यांनी शिस्त पाळली. या अठरा पगड जाती-धर्मांच्या आणि बहुपक्षीय राजकारण असलेल्या भारताने एक प्रकारे सर्वपक्षीय लॉकडाऊनच आतापर्यंत पाळला. त्याचीच पावती म्हणून आता सरकारने स्वत:च तिसरा लॉकडाऊन जाहीर करताना काही अटी शिथिल केल्या आणि  बाजारहाट सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. बलाढ्य लोकशाहीचे हे खरे लक्षण. लोकांनी काही मागण्यापूर्वीच सरकारने ते देण्यास सुरुवात केली. बाजारपेठ हळूहळू आता उघडू लागेल. व्यवहार सुरू होतील. पूर्णपणे थांबलेला लक्ष्मीचा संचार जाणवू लागेल. कोरोनासोबत राहूनही अर्थचक्र न थांबवता ते अविरत धावते ठेवण्याचे सरकारने धाडस केले. त्यात आपण सरकारला साथ देऊया!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT