पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या गणेशोत्सवात 'आव्वाज कोणाचा, फक्त ढोल-ताशा पथकांचा…' याची अनुभूती पुणेकरांना आली. पारंपरिक वेशभूषेत मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी बाप्पाच्या स्वागतासाठी मिरवणुकीत सहभागी झालेल्या पथकातील वादकांनी बेधुंद वादन केले आणि आपल्या तालावर तरुणाईला थिरकायला भाग पाडले. वादनाचा गजर अन् वादकांचा उत्साह, असे समीकरण जणू जुळून आले होते. मंडळांच्या मिरवणुकीत खासकरून ढोल-ताशा पथकांनी पुणेकरांचे लक्ष वेधले आणि वादनाच्या जल्लोषात प्रत्येक जण मनसोक्त थिरकला. पथकातील तरुण-तरुणींचा उत्साह आणि आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता.
दरवर्षी गणेशोत्सवात गणपती मंडळांच्या मिरवणुकांमध्ये पथकातील तरुणाई आपल्या उत्कृष्ट वादनाने पुणेकरांचे लक्ष वेधते. यंदाही जल्लोषपूर्ण वादन करीत पथकातील तरुणाईने पुणेकरांची मने जिंकली. ढोल-ताशांचा ठेका आणि ध्वज पथकांत सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपल्या सादरीकरणाने गणेशोत्सवाच्या वैभवशाली परंपरेची प्रचिती दिली. लक्ष्मी रस्ता असो वा बाजीराव रस्ता… सगळीकडे ढोल-ताशा पथकांचा निनाद पुणेकरांना ऐकायला मिळाला.
मंडळांच्या मिरवणुकीत यंदा तीन ते चार पथके सहभागी झाली होती. प्रत्येक चौकात फक्त ढोल-ताशांचा निनाद कानी पडत होता. बेभान होऊन तरुण-तरुणी वादन करीत होते आणि हाच निनाद ऐकण्यासाठी पुणेकरांचीही सकाळपासून गर्दी झाली होती. श्रीराम, शौर्य, संघर्ष, शिवमुद्रा, ताल, अभेद्य, शिवप्रताप, समर्थ प्रतिष्ठान अशा विविध पथकांतील तरुणाईने आपल्या वादनाने यंदाची गणेश आगमनाची मिरवणूक गाजवली. फक्त तरुणाईच नव्हे तर यंदा पथकांत काही लहान मुलेही सहभागी झाली.
मिरवणुकीत प्रत्येकाने पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला आणि नाचायला भाग पाडले. कोणी कॅमेर्यात हे क्षण टिपत होता तर कोणी रील्स काढत होता. यंदा वादनात सर्वाधिक लक्ष वेधले ते महिला-युवतींनी देखणी वेशभूषा आणि देखणे वादन हे त्यांच्या सादरीकरणाचे वैशिष्ट्य ठरले. जिथे पाहाल तिथे पथकांचे वादन सुरू होते. पुण्याच्या मिरवणुकीचा अविभाज्य घटक असलेल्या पथकांचे वादन लक्षवेधी ठरले.
ढोल-ताशा पथकांचे वादन लक्ष वेधून घेणारे होतेच; पण बँड पथकांच्या सुरेल वादनानेही पुणेकरांची मने जिंकली. यंदा पथकांसह बँड पथकांचाही मिरवणुकीत सहभाग होता. प्रभात बँड, न्यू गंधर्व ब—ास बँड, गंधर्व ब—ास बँड, मंगेश बँड पथक, दरबार बँड, मयूर बँड पथकांचा मिरवणुकांमध्ये होता. बँड पथकातील प्रत्येक वादकाने आत्मविश्वासाने बहारदार वादन केले. पारंपरिक बँड पथकांचे सुरेल वादनही पुणेकरांना आनंदित करून गेले.
हेही वाचा